मुख्याध्यापक संघात राजकारणाचा पारवा घुमू लागला

– संजोक काळदंते

ओतूर – सरस्वतीचे मंदिर असणाऱ्या आणि ज्ञानदानाचे अखंड कार्य करणाऱ्या गुरुजींच्या मुख्याध्यापक संघात सुद्धा राजकारणाचे वारे वाहू लागले आहेत. समाजामध्ये शिक्षक हा ज्ञानाचा अखंड दीप तेवत ठेवून उद्याची आदर्श पिढी घडवत असतात. मात्र, या शिक्षणाचा दर्जा शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांना तालुका पातळीवर गुणवंत शिक्षक पुरस्कार चालू केला. यामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी अशी चार जणांना हा पुरस्कार दिला जातो. मात्र गेले काही दिवसांपासून मुख्याध्यापक संघांमध्ये पुरस्कार मिळवण्यासाठी जोरदार “लॉबिंग’ व रस्सीखेच चालू असल्याची चालू असल्याचे समजते.

हा पुरस्कार मिळवण्यासाठी मुख्याध्यापक संघाने काही निकष लागू केले आहेत. मात्र या नियमाला हरताळ फासून आपल्या मर्जीतल्या व्यक्तीलाच पुरस्कार देण्यास सुरुवात केल्यामुळे अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. ज्ञानदानाचे कार्य करून समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या या शिक्षकांच्या संघामध्ये चक्क राजकारण करून पुरस्कार मिळविण्याची परंपरा चालू केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा कुरघोडी व राजकारणाचा शिरकाव करीत असल्यामुळे राजकारणही पुढाऱ्यांभोवती केंद्रित न राहता ते आपली व्याप्ती सर्व क्षेत्रात वाढवत असल्याचे दिसत आहे.

संघ स्थापनेचे प्रयोजन
विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या काही ज्ञानधुरंधरांना समाजाकडून कौतुकाची थाप मिळावी अशी अपेक्षा असते; पण हे गुरुजन यापासून वंचितच राहतात. यामुळे एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून पुणे जिल्ह्यातील एकूण 1200 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचा एक संघ स्थापन करण्यात आला. प्रत्येक तालुका पातळीवर यांची एक शाखा बनवण्यात आली या माध्यमातून मुख्याध्यापकांच्या व शिक्षकांच्या अडचणी शैक्षणिक जडणघडणीतील विचाराचे आदान-प्रदान, चर्चासत्रे या माध्यमातून आपला आवाज सनदशीर मार्गाने सरकार पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा संघ करत असतो.

13 तालुक्‍यातील मुख्यध्यापकांचा समावेश
77 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या या मुख्याध्यापक संघात पुणे जिल्ह्यातील एकूण 13 तालुक्‍यात 1200 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचा समावेश असून पुणे शहरातील पूर्व पश्‍चिम व पिंपरी चिंचवड यांचा यामध्ये समावेश होतो

प्रत्येक तालुकास्तरीय कार्यकारिणी समिती जिल्हा समितीने मंजूर केलेल्या एकूण 21 निकषानुसार गुणवंत शिक्षकाची निवड करीत असते. आतापर्यंत याबाबत कुणाची तक्रार आलेली नाही. मात्र, अपवादात्मक म्हणून काही ठिकाणी असे घडले असेल तर त्यामध्ये निश्‍चितच सुधारणा करण्यात येतील
– हरिश्‍चंद्र गायकवाड, अध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ


पुरस्कार प्रक्रिया राबवताना जिल्हा संघ स्तरावर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये तालुकास्तरावर असलेल्या कार्यकारिणीकडे प्रस्ताव सादर करावेत. यासाठी तालुका पातळीवरील प्रत्येक शिक्षकाकडे परिपत्रक पाठवले जाते आणि यानुसार तालुकास्तरीय समिती गुणवंत शिक्षकांची निवड करून जिल्हा संघाकडे त्यांची शिफारस करण्यात येते आणि हे सर्व काम पारदर्शक पद्धतीने होते.
– महेंद्र गणपुले, प्रवक्ते जिल्हा मुख्यापक संघ

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here