धर्माचं राजकारण की राजकारण हाच धर्म…

आजच्या परिस्थितीत आपल्याला जर जगायचे असेल तर मुळात स्वयंशिस्त, संयम आणि जागरूकता खूप गरजेची आहे; परंतु सामान्य जनता या तीनही गोष्टींपासून प्रचंड दूर असल्याने शासनाला कठोर निर्णय घेऊन या तीनही गोष्टी जनतेला पाळण्यासाठी भाग पाडावे लागत आहे.

मुळातच गडगडलेल्या आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या भारतीयांना करोनारूपी भुजंगाचा विळखा पडला आणि मग बऱ्याच गोष्टी मूलभूत पातळीवरून पाहण्याची गरज सगळ्यांनाच वाटू लागली. सत्तांध, बलाढ्यांच्या बेधुंद मानसिकतेची अत्युच्च निष्पत्ती म्हणजे करोना. असो, तो वेगळाच वैचारिक विषय आहे.

संपूर्ण मानवजात या विषाणूमुळे पूर्णत: धोक्‍यात आलेली असताना मूठभर राज्यकर्ते किंवा तथाकथित सामाजिक प्रबोधनकार वेगवेगळ्या वैचारिक प्रवाहांमध्ये समाजाला ढकलत आहेत आणि त्यात जो प्रवाह ज्याला बरोबर वाटेल त्यात तो वाहवत जात आहे. हे प्रवाह हळूहळू एकमेकांवर आदळू लागल्यावर आधीच चालू असलेल्या अस्तित्वाच्या लढाईत आणखी मारामाऱ्यांची वैचारिक गुंतागुंतीची आणि परिणामी मानव जमातीच्या ऱ्हासाकडे अधिक वेगाने घसरण सुरू झाली आहे.

या करोनामुळे आम्हाला काही होणार नाही, आमच्या धर्मग्रंथात याचा आधीच उल्लेख आहे, इथपासून ते आम्हाला त्रास देणाऱ्या इतर धर्मियांच्या नाशासाठीच करोना आला आहे इथपर्यंत विविध वैचारिक प्रवाह समाजाची दिशाभूल करून आपला स्वार्थ साधण्यासाठी अनेक शक्‍ती कार्य करत आहेत. खरंच या लोकांना काय साध्य करायचं आहे! आजच्या विज्ञानयुगात अजूनही ह्या अशा वैचारिक प्रवाहांना बळी पडून माणूसच माणसाच्या जीवावर उठला आहे. कोणत्याही धर्मात माणसाने माणसाला संपवण्याची शिकवण निश्‍चितच लिहिलेली नाही.

अतिरिक्‍त पैशाची हाव, सत्तांध नेतेमंडळी, भोगवादी समाज ज्याला विनासायस सर्व सुख, चैन हवी आहे. जे मिळवण्याच्या नादात वर लिहिल्याप्रमाणे आम्ही स्वयंशिस्त, संयम आणि जागरूकता कधीच विसरलो आहोत. भोग, विलास आणि चैन यामध्ये स्वास्थ्य, ज्ञान आणि कुटुंब व्यवस्था हरवून कधी गेली ते समजलेच नाही. प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये पालन करण्यासाठी मूळ बैठक म्हणून याच विचारांवर अंमल असलेला दिसतो व तो पाळलाच जावा यासाठी धर्माच्या चौकटीमध्ये ती वैचारिक बैठक बसवलेली आढळते. जसजसे प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंचा ताबा सत्ताधीशांनी सत्ता वाढविणे व समाजावरची पकड मजबूत करण्यासाठी घेतला तेव्हापासून धर्माचा वापर खूपच प्रभावी व ताकदवान शस्त्र म्हणून होऊ लागला.

अनेक वर्षांचा विविध देशांचा इतिहास हेच दाखवितो आणि आजही तेच चालू आहे. मनुष्य धर्म केव्हाच संपला आणि आता असलेले तथाकथित धर्म म्हणजे सत्ताधाऱ्यांनी माजवलेली आणि स्वत:च्या स्वार्थासाठी पोसलेले हिंस्त्र श्‍वापदांचे समूह आहेत. आज या सगळ्यांचा अतिरेक झालाय. राजकारणी धर्माचा वापर करून “फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब करून वेगवेगळ्या धर्माची कोंबडी आपसात झुंजवून त्याचा स्वार्थासाठी उपयोग करताना खुलेआम दिसतात. समाजाला ते समजतेही पण धर्मांधतेच्या डोळ्यावर आलेल्या झापडांमुळे त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आपसातच झुंजतोय आणि आपापल्या माणसाला संपविण्यासाठी पिसाटासारखे एकमेकांवर धावून जातोय.

गुणवत्ता, नीतिमत्ता, कार्यक्षमता, कार्यकुशलता वगैरे निकष कधीच संपले आणि सगळे निकष फक्‍त धर्माच्या आधारावर ठरविले गेले. शोषित किंवा पीडित समाजाच्या उत्थानाच्या नावाखाली जे खरे निकष असायला हवेत ते बासनात गुंडाळून ठेवले गेलेत. आर्थिक दुर्बल, पीडित शोषितांसाठी सर्व शिक्षण, शिक्षण साहित्य, भोजन, निवास सर्व काही मोफत करून गुणवत्तेच्या निकषांवर आधारित सामाजिक व्यवस्था निर्माण करता आली असती; परंतु मग फोडा आणि राज्य करा, कसे जमणार! याचा परिणाम काय झाला? चुकीच्या निकषांवर फक्‍त धर्माच्या शिडीवरून चढून आलेला उंचावर बसून त्यांच्या बौद्धिक कुवतीनुसार कार्य करू लागले आणि बहुतांशी अशा लोकांचा भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा कार्यभाग बनला. संपूर्ण समाज ह्या धर्मांधतेच्या लढाईत विकलांग झाला आणि सत्ताधीश याचा आपल्या हातातील गुलाम म्हणून समाजाचा वापर करू लागले.

माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा. रोज आपल्यावर ह्या पलीकडे अनावश्‍यक असणाऱ्या असंख्य लालसांचे मायाजाल भांडवलदार व राजकारणी यांनी विणलय. जंक फूडपासून मदिरा सेवनापर्यंत असंख्य अनावश्‍यक सवयींमध्ये माणूस कसा अडकेल यासाठी हजारो लवलवणाऱ्या जाहिरातरूपी जीभा समाजाला आकृष्ट करून शोषून नामोहरम करत असतात. आज नाईलाजाने घरात बसल्यावर ह्या सगळ्या गोष्टींपैकी कशामुळे आपले खरंच अडतंय का? कष्टाने मिळवलेली संपत्ती आपण कशा गोष्टींवर उधळत असतो आणि त्यामागे धावून धावून स्वत:ला संपवत असतो.

करोनामुळे खरंच आपल्याला आज आपल्या खऱ्या गरजा काय! संयम पाळला व घरात बसलो तरच आपण जिवंत राहणार आहोत! आपले कुटुंब हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असून त्यासाठी आपण वेळ दिलाच पाहिजे. इथपासून ते आज कोणत्याही धर्माचा कोणीही धर्मगुरू नाही तर स्वत:ची जागरूकताच स्वत:ला वाचवू शकते हे लक्षात येतयं. सर्व धार्मिक स्थळे आज कुलूपबंद आहेत! याच धार्मिक स्थळांवर समाज स्वत:च्या स्वार्थासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावून त्या देवालाच वेठीला धरत असतो. धर्मपीठांना कोट्यधीश बनवत असतो. आज त्यापैकी कोणीही मदतीला नाही येऊ शकत!
आताच्या परिस्थितीत आपण सहीसलामत वाचण्याचा आणि जिवंत राहण्याचा विचार करीत आहोत.

समजा, जिवंत राहिलो तर पुढं काय? संपूर्णत: रसातळाला गेलेली आर्थिक व्यवस्था, मोडकळीस आलेले उद्योगधंदे आणि कंबरडे मोडलेले व्यापारी! करोनामधून बाहेर पडल्यावर सगळ्याच व्यवस्थांवर प्रचंड ताण येणार. समाज कोंडवाड्यातून मोकाट सुटलेल्या गुरांप्रमाणे प्रचंड संख्येने रस्त्यावर येणार आणि पुन्हा एकदा सर्व गोष्टींचा समतोल ढासळणार. पैशासाठी, उद्योगांसाठी, दोनवेळच्या घासासाठी अशा अनेक गरजांसाठी माणूस माणसाच्या जीवावर उठणार! हे कसं थांबणार!

माणसाने माणासासारखं वागून, मनुष्य धर्माच पालन करून माणसासारखं जगायचं ठरविल्यास मनुष्य जमात अस्तित्वात राहील अन्यथा निसर्ग आपल्याला धडा शिकवतोच आहे. पाहा ना ओझोनचा फाटलेला स्तर पुन्हा पूर्ववत झालाय, हवा प्रदूषणविरहित शुद्ध होऊ लागलीय. निसर्ग पुन्हा समतोल साधून आपल्याला संधी देतोय. पण तरीही जे संयम, स्वयंशिस्त आणि जागरूकता ह्या धर्माला अनुसरून वागत नाहीयेत ते प्राणाला मुकताहेत. म्हणूनच मनुष्य जमातीमधील माणसाने आतातरी जागे होऊन मनुष्य धर्माचे पालन करून आपलं अस्तित्व टिकवण्याची वेळ आली आहे. या प्रसंगातून धडा घेऊन आपण शहाणे झालो नाही तर आपलं अस्तित्व आज नाही तर उद्या हा निसर्ग नाईलाजाने संपवेल.

लक्षवेधी : आनंद फडके

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.