निघोज – पारनेर तालुक्यातील निघोज जिल्हा परिषद गट तसेच निघोज व अळकुटी पंचायत समिती गणांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे. संभाव्य उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून, गावागावात चर्चांचा माहोल रंगू लागला आहे.या भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात नेहमीच चुरशीची लढत होत आली आहे. यंदाही तीच रंगत पाहायला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक स्तरावर अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबतच तरुण नेतृत्वही उमेदवारीसाठी सक्रिय झाले असून, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गावागावातून कार्यकर्त्यांच्या बैठका, जनसंपर्क दौरे, विकासकामांचे आढावे आणि मतदारांशी संवादाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. उमेदवारीसाठी नेत्यांकडे धाव घेणाऱ्या इच्छुकांची लगबग वाढली असून, प्रत्येक पक्षात अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे. यंदाच्या निवडणुकीत स्थानिक विकासाचे मुद्दे अग्रक्रमावर राहतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार निर्मिती हे विषय प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरणार आहेत.दरम्यान, निघोज व अळकुटी परिसरातील मतदारसंघांमध्ये कोणाला उमेदवारी मिळते, कोणते नवे चेहरे पुढे येतात आणि कोणत्या गटात जुळवाजुळव होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावोगावी होणाऱ्या बैठका आणि चर्चांमधून निवडणुकीची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली असून, सर्वसामान्य मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे. राजकीय जाणकारांच्या मते, यंदाची निवडणूक ही केवळ पक्षांमधील नव्हे, तर स्थानिक पातळीवरील नेतृत्वाची कसोटी ठरणार आहे. त्यामुळे निघोज जिल्हा परिषद गटासह निघोज आणि अळकुटी पंचायत समिती गणातील निवडणूक रंगतदार, चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार आहे, हे निश्चित आहे.