“द काश्मीर फाईल्ससाठी राजकीय अजेंडा वापरला जातोय,पंतप्रधानच त्याचे प्रचारक”; संजय राऊतांची टीका

मुंबई : द काश्मीर फाईल्स या सिनेमावरुन सध्या देशभर वेगवेगळी मतं व्यक्त होताना दिसत आहेत. तसेच त्यावरून राजकारणदेखील होताना पाहायला मिळत आहे. याच राजकारणात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील उडी घेतली आहे. काश्मीर फाईल्सचे मोदी हे सर्वात मोठे प्रचारक आहेत. हा एक राजकीय अजेंडा राबवला जात आहे. काश्मिरी पंडितांची वेदना देशात बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकी कुणाला माहीत नसेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आज दिल्लीमध्ये बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मीर फाईलमध्ये अनेक सत्यं दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा आहे. महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसतं सिनेमा टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत, असे देखील राऊत म्हणाले.
राज्यपाल कोश्यारी यांच्यावर संजय राऊतांनी आज पुन्हा निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यपालांकडून ही अपेक्षा नाही. ते राजकारण करत आहेत, इतिहासात काळ्या अक्षरांनी यांची नोंद होईल, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. या पक्षातून राज्यपाल आले त्या पक्षाच्या दबावामुळे ते राजकारण करत आहेत. ज्या पातळीवर त्यांच्या पक्षाने आणि राज्यपालांनी हा संघर्ष नेऊन ठेवला आहे इतिहासात त्याची काळ्या अक्षराने नोंद होईल. घटना भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणं हे आणिबाणीची आठवण करून देणारं आहे, असेही राऊतांनी म्हटले आहे.
संजय राऊतांनी म्हटलं की, महाराष्ट्र पोलीस किती सक्षम हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून त्यांनी ते दाखवून दिलं. त्यामुळे आताही पोलीस सक्षमपणे काम करतील, असे राऊत म्हणाले. पंतप्रधानांनी राज्यातल्या सगळ्याच खासदारांना बैठकीला बोलावलं असतं पण भारतीय जनता पक्षाने त्यांना फक्त एका पक्षाचे पंतप्रधान करून ठेवलं आहे. ते संसदेचे नेते आहेत हे विसरत चालले आहेत, असे राऊत म्हणाले.





