प्रभात वृत्तसेवा पुणे : पुणे वाहतूक पोलिसांनी जानेवारीपासून आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून त्यांचे समुपदेशन केले आहे. मात्र, त्यानंतरही काही चालक पुन्हा मद्यपान करून वाहन चालवताना आढळत आहेत. पोलिसांनी आता अशा चालकांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती करणाऱ्यांचा वाहन परवाना रद्द करून कारागृहात टाकण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पुण्यात मागील वर्षी ६ हजार ७०० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, त्यापैकी ६७ जण दुसऱ्यांदा मद्यपान करून वाहन चालवताना आढळले, त्यांचा वाहन परवाना रद्द करण्यात आला. काहींना न्यायालयाने कारागृहात पाठवले होते. यावर्षी झालेल्या कारवायांमध्येही १४ जण दुसऱ्यांदा मद्यपान करून वाहन चालवताना सापडले असून त्यांच्या विरोधातही कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पुणे शहर वाहतूक विभागाने ६ ते ८ मार्च दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये विशेष मोहीम राबवली. या काळात शहरात ३० ठिकाणी नाकाबंदी करून ब्रेथ ॲनालायझरच्या साहाय्याने वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. त्यात १८९ चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत पकडलेल्या चालकांचे ११ मार्चला येरवडा येथील वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात समुपदेशन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला १३५ मद्यपी वाहनचालक उपस्थित होते. त्यावेळी मद्यपानानंतर वाहन चालविण्याचे गंभीर परिणाम आणि नियमांचे पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. मद्यपान करून दुसऱ्यांदा वाहन चालवताना सापडलेल्या व्यक्तीचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. तसेच, त्याला न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी करण्याची प्रक्रियाही राबवली जाईल. – मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मद्य पिऊन वाहन चालवल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होतात. यामुळे ही मोहीम तीव्र करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयालाही सहभागी करुन घ्यावे. तसेच, महामार्गावरही अशीच मोहीम राबवली जावी. मद्यपान करुन वाहन चालवल्याने अपघात होण्याचे प्रमाण मोठे आहे – राजू घाटोळे, अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य