पोलिसांनी केले नागरिकांना ‘हे’ महत्वाचे आवाहन

पिंपरी – गेल्या काही दिवसांमध्ये नागरिकांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून युनियन बँक ऑफ इंडिया यांचे नाव, लोगो व फोटो वापरुन मेसेज पाठवून त्याद्वारे व्हायरस पाठविण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असून इतर गोपनीय माहितीचा गैरवापर होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी मोबाइलवरून आलेल्या मेसेज मधील लींक, वेबसाईट, फाइल यांना क्लिक करु नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, सायबर सेल यांच्यावतीने करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया यांचे नाव, लोगो व फोटो वापरुन अनोळखी नंबरवरून मेसेज पाठवून नागरिकांची फसवणूक होत असल्याबाबतच्या तक्रारी सायबर सेलकडे येत आहेत. नागरीकांना त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अपडेट करणेबाबत मेसेज येऊन त्यामध्ये फाइल जोडण्यात आलेली असते. या फाइलव्दारे टारझन व्हायरस हा नागरीकांच्या मोबाइल फोनमध्ये पाठवून त्याव्दारे नागरीकांच्या वैयक्तीक माहितीचा गैरवापर होऊन मोठे नुकसान होऊ शकते.
चिंचवड पोलीस आयुक्तालय, सायबर सेल यांच्याकडून सर्व नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, अनोळखी मोबाइल क्रमांकव्दारे आलेल्या मेसेजमधील लिंक, वेबसाईट, फाईल यांना क्लिक करु नये.



