पुणे – मार्केट यार्ड येथील डाळींब यार्डातील 4 आडत्यांनी शेतकरी, खरेदीदारांची कोट्यवधींची लूट केली. या प्रकरणाला 8 महिने उलटूनही त्या आडत्यांवर कारवाई केली गेली नाही. त्यांचे व्यवसाय अद्यापही सुरू असून त्यांना पाठीशी घालण्याचे काम बाजार समिती प्रशासन करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी, खरेदीदारांना लुटा आणि व्यापार सुरू ठेवा’ असा पायंडाच बाजार समिती प्रशासन घालून देत असल्याचे स्पष्ट होत आहे. गुलटेकडी मार्केट यार्ड येथील डाळिंब यार्डमधील 4 आडत्यांनी डाळिंब उत्पादक शेतकरी आणि खरेदीदारांची पट्टीतून हमाली, तोलाई आणि लेव्हीच्या रकमेत नियमापेक्षा जास्त कपात करून सुमारे 15 ते 17 कोटींची लूट केल्याचा प्रकार 8 महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने त्या चौघा आडत्यांसह इतर सुमारे 70 आडत्यांची दफ्तर तपासणी हाती घेतली. 8 महिन्यांचा कालावधी उलटूनही तपासणी अहवाल समोर आलेला नाही. अहवालाचे काम पूर्ण होऊनदेखील बाजार समिती त्या आडत्यांवर दोष निश्चिती करून कारवाई करत नाही. त्यामुळे बाजार समिती प्रशासनच त्या आडत्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. दफ्तर तपासणी दिखाऊपणा? जानेवारी 2019 मध्ये शेतकरी, खरेदीदार लुटीचे प्रकरण समोर आले. त्यावेळी बाजार समितीकडून सुमारे 70 अडत्यांची दफ्तरे तपासणीसाठी हाती घेतली होती. त्याची तपासणी होऊनदेखील 8 महिने झाले. मात्र, त्यातून काहीच बाहेर आले नाही. नक्की दफ्तर तपासणीत काही सापडले नाही किंवा सापडले ते झाकण्याचा प्रयत्न बाजार समिती करत आहे, असा सवाल उपस्थित होत असून दफ्तर तपासणी दिखाऊपणा ठरणार का? अशी चर्चादेखील बाजारात सुरू आहे.