खालापूर, (वार्ताहर ) – खोपोली नगरपरिषदेने दिव्यांग मुलांंसाठी बांधलेल्या शाळेची दुरवस्था झाली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नवे बांधकाम करण्यासाठी यंत्रांचा वापरून केलेल्या कामामुळे छत, भितींना तडे गेले आहेत. छत गळत असून सर्वच वर्ग खोल्यांमध्ये पाणी साठले आहे. यामुळे बेंच, शाळेच्या वस्तुंचे नुकसान झाले आहे. छताचे पीओपी पडले आहे, सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. भविष्यात छत कोसळून दुर्घटना होण्यापेक्षा शाळेची दुरूस्ती होईपर्यत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. शालोम एज्युकेशन सेंटर संचालित सोफिया दिव्यांग मुलांच्या शाळेला खोपोली नगरपरिषदेने दिव्यांग भवन विरेश्वर मंदिर समोरील वरची खोपोली येथे बांधून दिले आहे. काही दिवसांपासून इमारतीवर दुसरा स्लॅब टाकण्याचे काम सुरू केले आहे. ठोकाठोकी मुळे तडे गेले आहेत. तर ठेकेदार शाळेतील मीटरवरून कामासाठी वीज वापरत असल्याने अतिवापर केल्यामुळे शाळेची लाइट बंद असते, यासंबंधीची माहिती नगरपरिषदेला निवेदन पत्राद्वारे कळवूनही कोणतेही कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे. वर्ग खोल्यांमध्ये पीओपी कोसळले असू्न वायर तुटल्या आहेत. सर्व खोल्यांमध्ये पाणी साठले होते. दिव्यांंग मुलांच्या शाळेची दुरवस्था झाल्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक किशोर पानसरे, सामाजिक कार्यकर्ते शयाम कांबळे, विजय तेंडुलकर यांनी शाळेची पाहणी केली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेची दुरावस्था पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. त्यानंतर बांधकाम अभियंता अनिल वाणी, अविनाश गायकवाड यांना पालकांनी चांगलच सुनवलं. अनेक अडीअडचणींवर मात करून दिव्यांग मुलांसाठी नगरपरिषदेने भव्य शाळा बांधली आहे. शाळा सुरू झाल्यापासून कोणतेही आङचण आली नव्हती, मात्र शाळेच्या वरच्या मजल्यावर शाळेचे काम सुरू झाल्यापासून इमारत गळत आहे. याबाबत नगरपालिकेत पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापिका सुभा पाटणकर यांनी केला आहे. येथील विद्यार्थी दिव्यांग आहेत, भविष्यात छत कोसळल्यास किंवा इतर काही दुर्घटना घडल्यास मुलांना सामान्य मुलांप्रमाणे स्वत:ची सुरक्षा करता येणार नाही. दुर्घटना होण्यापेक्षा शाळेची दुरूस्ती होईपर्यत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे पालकांनी सांगितले आहे.