नगर शहराची जागा तुतारीला; अभिषेक कळमकर यांना शरद पवार गटाची उमेदवारी चर्चेला आता पूर्णविराम

नगर – नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडण्यात आली आहे. या मतदारसंघाने शरद पवार गटाने माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी शनिवार (दि. २६) रोजी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये कळमकर यांचा नावाचा समावेश आहे.
महाविकास आघाडीमधून नगर शहराची जागा शरद पवार गटाकडे जाणार की ठाकरे गटाकडे या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता नगर शहरातून आमदार संग्राम जगताप व माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यात लढत होणार आहे.
नगरशहर विधानसभा मतदार संघाची जागा ही गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाकडे होती. सध्या निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून, दोनच दिवस अर्ज भरण्यासाठी शिल्लक आहेत. नगरशहर विधान सभा मतदार संघाची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी शिवसैनिकांची होती.
मात्र आज ही जागा शरद पवार गटाकडे गेल्याने शिवसेनेच्या पदाधिकार्यांसह सर्व नगरसेवक, शिवसैनिकामंध्ये नाराजीचा सुर आहे. शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा तुतारीला गेल्याने शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे आता नगरकरांचे लक्ष लागेले आहे.



