दुसऱ्या दिवशीही पिंपरी-चिंचवड महापालिकेची वेबसाइट हॅंग

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नियोजित तीन प्रकल्पांमधील सदनिकांची संगणकीय सोडत शनिवारी (दि.27) पार पडली. मात्र आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे पाहण्याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने महापालिकेच्या वेबसाइटला भेट दिल्याने शनिवारी दिवसभर वेबसाइट हॅंग झाली होती. ती दुसऱ्या दिवशीही सुरळीत होऊ शकली नाही. सलग दुसऱ्या दिवशीदेखील महापालिकेची वेबसाइट हॅंग असल्याने नागरिकांना लाभार्थींची यादी उपलब्ध होऊ शकली नाही.

उद्योगनगरीत हक्काचे छप्पर असावे, याकरिता प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. मात्र, खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या गृह प्रकल्पातील सदनिकांची किंमत लाखोंच्या घरात जात असल्याने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना या गृह प्रकल्पांमध्ये घेणे घर परवडत नाही. त्यामुळे महापालिकेने चिखली घरकुलनंतर चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी आणि रावेत या तीन प्रकल्पांमध्ये एकूण 3 हजार 664 सदनिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. या गृहप्रकल्पांमधील सदनिकांसाठी 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले होते.

दरम्यान, या तीनही गृहप्रकल्पांच्या सोडतीमधील लाभार्थींची नावे महापालिकेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली. सकाळपासूनच नागरिकांनी वेबसाइटला भेट दिल्याने शनिवारी ही वेबसाइट हॅंग झाली. तर सलग दुसऱ्या दिवशीदेखील हीच परिस्थिती राहिल्याने वेबसाइटवर अवलंबून असलेल्या नागरिकांना ही यादी पाहता आली नाही.

सोशल मीडियावर यादी व्हायरल
महापालिकेची वेबसाइट हॅंगच असली तरीदेखील सोशल मीडियावर सोडतीची यादी व्हायरल झाली होती. त्यामुळे अनेकांना ही यादी सोशल मीडियावरच उपलब्ध झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.