पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २३) अर्ज वाटप आणि स्वीकृतीला सुरूवात झाली आहे. अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी शहरातील ३२ प्रभागांतून तब्बल ८७५ उमेदवारांनी २ हजार २१२ इतके अर्ज नेले आहेत. महापालिका निवडणुकीची ऱणधुमाळी सुरू झाली आहे. मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र नेण्यास सुरूवात झाली आहे. त्याची मुदत ३० डिसेंबर असून त्यादिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवार नामनिर्देशनपत्र घेऊन जाऊ शकतात. यंदा तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक होत आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अद्याप शहरातील प्रमुख पक्षांनी आपली उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. असे असतानाही मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज नेण्यासाठी निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक अर्ज प्रभाग क्रमांक १७ मधील ५० उमेदवारांनी ९६ अर्ज नेले आहेत. मात्र, अद्याप कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. जसजसे उमेदवार जाहीर होतील तशी ही संख्या आणखी वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.