सूरत – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुजरातमधील सुरत शहरातील एका कापडगिरणी कामगाराला बुधवारी अटक करण्यात आली. अंकित मिश्रा असे या कामगाराचे नाव असून तो मूळचा बिहारचा आहे. त्याला सूरत शहरातील लस्काना भागातून पकडण्यात आले आणि पुढील तपासासाठी बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, असे सूरत गुन्हे शाखेचे निरीक्षक ललित वगाडिया यांनी सांगितले.
20 मार्च रोजी एका व्यक्तीने पाटणास्थित वृत्तवाहिनीच्या कार्यालयात फोन केला होता आणि दावा केला होता की, तो येत्या 36 तासांत मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उडवून देईल. या संदर्भात बिहारची राजधानी पाटणा येथील सचिवालय पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली होती.
बिहार पोलिसांनी केलेल्या तपासणीत हा कॉल सुरतमधून आल्याचे उघड झाले, त्यानंतर बिहार पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सुरत पोलिसांची मदत घेतली. शेवटी अंकित मिश्रा नावाच्या कॉलरला पकडण्यात आम्ही यशस्वी झालो असे बिहारच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्याला पाटणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
Covid 19 : काळजी घ्या..! देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 134 कोरोना रुग्णांची नोंद
सुरत पोलिसांच्या प्राथमिक तपासात मिश्रा गेल्या सहा वर्षांपासून शहरातील लसकाना भागातील एका यंत्रमाग कारखान्यात मजूर म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने अशी धमकी का दिली याची माहिती अजून मिळायची आहे.