कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक ! ‘या’ कारणासाठी दिली होती धमकी.. आरोपीने केला धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली – वृंदावनच्या अनिरुद्धाचार्य महाराज यांना एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करून ती न दिल्यास उडवून देण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या धमकीच्या कृत्यामागे फरिदाबादमधील बल्लभगड शहरातील तरुण असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला अटक देखील केली. आरोपी सुमारे दीड महिन्यापासून गौरी गोपाल आश्रमात वास्तव्याला होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
परिक्रमा मार्ग संत कॉलनी येथील रहिवासी, गौरी गोपाल आश्रमाचे निवेदक अनिल कुमार तिवारी (अनिरुद्धाचार्य महाराज) यांना ५ एप्रिल रोजी धमकीचे पत्र आले होते. या पत्रात एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास तुमच्यासह कुटुंबीयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. यानुसार वृंदावन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. एसएसपी शैलेश कुमार पांडे यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
सीसीटीव्हीवरून आरोपीची ओळख पटली
एसएसपी म्हणाले, सीसीटीव्ही फुटेज इत्यादींवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली. यावरून सुरेश कुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घडलेली घटना मान्य केली.
या कारणासाठी दिली धमकी
मुलांच्या उपचारासाठी सुमारे दीड लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे घरात गोंधळ उडाला आणि तो वृंदावनात आला. येथील प्रेम मंदिरात पर्स हरवल्यानंतर तो गौरी गोपाल आश्रमात राहू लागला. अनिरुद्धाचार्य यांच्यावर खूप पैसा आहे, त्यांना धमकावून पैसे का घेऊन नये, असा विचार त्यांच्या मनात आला यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.





