रक्तदानात महिलांचा टक्का कमीच ! हिमोग्लोबिनची कमतरता ठरतेय अडसर

पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – महिलांचा वावर सर्वच क्षेत्रात वाढलेला आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरातही महिलांचा मोठा सहभाग दिसतो. मात्र, अनेकदा आपणही रक्तदान करावे, असे वाटूनही हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रक्तदान करता येत नाही, ही अनेक महिलांची समस्या आहे. पिंपरी चिंचवड शहरातील किमान 50 ते 60 टक्के महिलांना हिमोग्लोबनिच्या कमतरतेमुळे रक्तदान करता येत नसल्याचे समोर आले असून रक्तदानात महिलांचा टक्का कमीच दिसून येत आहे..
हल्ली विविध कारणांनी रक्तदान शिबिरे भरविली जातात. तेथे रक्तदान करणाऱ्या महिलांची संख्याही वाढत आहे. मात्र, अजूनही हे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत खूपच कमी आहे. किमान 30 ते 40 टक्केच महिला आजही रक्तदान
करू शकतात.
रक्तदानाला गेल्यावर हिमोग्लोबिन अर्थात रक्तातील लोहाचे प्रमाण कमी भरल्याने इच्छा असूनही रक्तदान करता येत नसल्याचे चित्र आहे. या महिलांचाही रक्तदान शिबिरात टक्का वाढल्यास रक्तसंकलन वाढेल. शहरी भागातील महिला आरोग्याविषयी सतर्क असतात, असे म्हणतात. पण आजही 50 ते 60 टक्क्यांहून अधिक शहरी महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून येते. फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी कमी असेल तरी हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ लागते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सकाळची वेळ प्रत्येक महिलेसाठी अगदी धावपळीची. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारी महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे त्यांच्यात ही समस्या जाणवते. त्यामुळे कितीही धावपळ झाली तरी आहाराकडे दुर्लक्ष करू, नये असा सल्ला डॉक्टर देतात.
हल्ली महिला आपल्या आरोग्याविषयी खूप जागृत झालेल्या दिसतात. त्यासाठी त्या निमित जीम करतात. तसेच अनेकजण सकाळी आणि संध्याकाळी फिरायला नियमितपणे अगदी न चुकता जातात. पण हिमोग्लोबिन वाढविणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश नसल्याने वरवर अगदी सुदृढ दिसत असल्या तरी आतून अनेक महिला अशक्त असतात. पुरूषांनी तीन महिन्यांतून एकदा तर महिलांनी चार महिन्यांतून एकदा रक्तदान करावे. रक्तदान करण्यासाठी महिलांच्या शरिरातील लोहाचे प्रमाण हे 12 किंवा त्यापेक्षा जास्त तर पुरूषांच्या शरिरातील लोहाचे प्रमाण हे 14 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. पण बहुतांश महिलांचे हिमोग्लोबिन हे 10 किंवा त्यापेक्षाही कमी असते, असे डॉक्टरांचे निरिक्षण आहे.
रक्तदान करण्यासाठी आलेल्या महिलांमधील 50 ते 60 टक्के महिलांना हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्तसंकलनही कमी होते. महिलांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढल्यास रक्तसंकलनासाठी उपयोग होईल. तसेच महिलांनी हिमोग्लोबिन प्रमाणात राहिल यासाकडे लक्ष द्यावे.
– डॉ. शंकर मोसलगी, रक्तसंक्रमण अधिकारी, वायसीएम.
असे वाढवा हिमोग्लोबिन
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात सोयाबीन, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, बीट, गाजर, गुळ- शेंगदाणे, डाळींब, बदाम, तांदूळ, टोमॅटो, सफरचंद, खजूर या पदार्थांचा आहारात समावेश करावा. त्याने लोहाचे प्रमाण जलद गतीने वाढते.





