रेडा -तीन दशकांपासून प्रलंबित असलेला इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याच्या प्रक्रियेत आला आहे. राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत तालुक्यातील शेती सिंचनाविषयी विविध निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात इंदापूर तालुक्याच्या पाणी प्रश्नावर जलसंपदा विभागाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय घाणेकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव चक्रवर्ती, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सैनिक, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
भरणे यांनी तीस वर्षांतील शेतीच्या पाण्याची भीषण परिस्थिती मांडली. उपाययोजनांबाबत तयार केलेला आराखडा सादर केला. दरम्यान, मंत्री भरणे यांनी सुचवलेल्या उपाययोजनांवर मंत्री समितीची चर्चा झाली. दरम्यान, यावेळी उजनी जलाशयातून उपसा सिंचन योजनेद्वारे शेटफळगढे येथील खडकवासला कालव्यामध्ये पाणी टाकून खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर तालुक्यातील लाभक्षेत्रास पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी उपसासिंचन योजनेचा तात्काळ सर्व्हेचे आदेश दिले आहेत.
उजनी बॅकवॉटर क्षेत्रांमध्ये उभाराव्या लागणाऱ्या बॅरेजेसचा सर्व्हे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. इंदापूरातून गेलेल्या खडकवासला कालवा व सर्व वितरकांचे दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले. नीरा डावा मूळ कालवा पूर्णपणे नव्याने वाढीव वहन क्षमतेचा करण्याचा सर्व्हे करून कालवा अस्तरीकरण व कॉंक्रिटीकरण करण्याचे अंदाजपत्रक तात्काळ शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शेटफळ हवेली तलावाची राहिलेली अपूर्ण उंची वाढवण्याचे काम व सांडवा वितरिकेचे अपूर्ण काम करण्याचे आदेश देण्यात आले.
नीरेवरील जांब, खोरोची, चिखली, वालचंदनगर, कुरवली, निरनिमगाव, पीठेवाडी व बोराटवाडी येथील बंधारे व भीमा नदीवरील भाट निमगाव, टण्णू, नरसिंहपूर येथील बंधारे दुरूस्तीसाठी व कॉंक्रीटीकरणाच्या कामाची अंदाजपत्रके कृष्णा खोरे विकास मंडळाकडे सादर करून आवश्यक निधी मंजूर करावा, असे निर्देश देण्यात आले. नीरेवरील उद्धट व सोमंथळीच्या धर्तीवर खोरोची बेटात नव्याने बॅरेजेसच्या बांधकामासाठी सर्व्हे करून अहवाल महामंडळाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेचे 5 हजार 600 हेक्टर क्षेत्रासाठी तात्काळ सर्व्हे करण्याचे आदेश दिले.