वाल्हे : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (दि.३१) जानेवारीपर्यंत निवडणुका घ्याव्यात, असा आदेश दिला असला तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये या निवडणुका संदर्भातील आचारसंहिता कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा सर्वच जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार पाहत आहेत. नीरा – कोळविहिरे जिल्हा परिषद गटात आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांनी जनसंवाद सुरू केला आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची आणि प्रतिष्ठतेची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठा नीरा – कोळविहिरे जिल्हा परिषद गट हा मागील (२०१७) प्रमाणेच नागरिकांचा मागासवर्ग महिला आरक्षित झाला आहे. सलग २५ वर्षे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ अपवादात्मक मागील काळात (२०१७) शिवसेनेने बाजी मारली होती. हा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी राष्ट्रवादी पुन्हा प्रयत्नशील झाली आहे. यातच शिवसेना शिंदे गट, भाजप, शरद पवार गट, शिवसेना उबाठा, आप, मनसे असे सात व काही अपक्ष उमेदवार रिंगणात उतरतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. नीरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गटात ओबीसी महिला आरक्षण आले आहे. गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून नीरेच्या सरपंच तेजश्री विराज काकडे, निकिता योगेश ननवरे, कॉंग्रेसमधून पिसुर्टी माजी सरपंच सविता राजेंद्र बरकडे, भाजपाकडून भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या पत्नी, वाल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सम्राज्ञी सचिन लंबाते, माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या सूनबाई सानिका अजिंक्य टेकवडे, सीमा संदीप धायगुडे, हेमा उमेश चव्हाण, राधाबाई माने, शिवसेनेकडून भारती अतुल म्हस्के, सुजाता वसंतराव दगडे, तेजस्विनी गणेश गडदरे, ज्योती सागर भुजबळ हे संभाव्य उमेदवार आपले जातीचे दाखले मिळवून आपल्या पक्षांकडे उमेदवारीची मागणी करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडून चव्हाण कुटुंबातील महिलांची निवडून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या नीरा- कोळविहीरे गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ताकदवान दिग्गज नेते असताना शिवसेनेने बाजी मारली होती. निवडणुकीत शिवसेनेच्या शालिनी पवार विजयी झाल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या तेजश्री विराज काकडे यांचा पराभव केला होता. मागील निवडणुकीतील पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. या निवडणुकीत पुन्हा हा जिल्हा परिषद गट ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. नीरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गटाशेजारी ‘बेलसर-माळशिरस’ या जिल्हा परिषद गटात मागील काही दिवसांपासून महिलांना थेट जोडण्यासाठी विविध गावांत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमांचे आयोजन, महिलांमध्ये भावनिक आणि सांस्कृतिक जोड निर्माण करण्यासाठी त्यांनी हळदी-कुंकू समारंभ, देवदर्शन यात्रा, महिला देवदर्शन सहली, क्रिकेट स्पर्धा, बैलगाडा शर्यत आदी पारंपरिक आणि सामूहिक सहभागाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. मात्र, नीरा-कोळविहीरे गटात असे कोणतेच उपक्रम, किंवा मेळावे कोणत्याच पक्षातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आयोजित करीत नसल्याने गटात निवडणुकीपूर्वीच संदर्भात कमालीची शांतता दिसत आहेत. सविता बरकडे यांची प्रतिमा उजळ नीरा-कोळविहीरे जिल्हा परिषद गटात सद्यःस्थितीत पिसुर्टी गावच्या माजी सरपंच सविता राजेंद्र बरकडे या अनेक गावांत स्वतः जाऊन महिला भेटून त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामे, पुढील काळात राबविण्यात येणारी कामे समजाऊन सांगून आपले परिचय पत्र वाटप करीत आहेत. सद्यःस्थितीत फक्त बरकडे याच जिल्हा परिषद गटातील गावा-गावांत घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. सविता बरकडे यांची प्रतिमा जनसामान्यांत उजळ ठरली असून त्यांनी संवाद सुरू ठेवला आहे.