Kolhapur bench | Supreme Court – कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठाच्या स्थापनेला दिलेले आव्हान सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत न्यायप्रवेशाच्या मूलभूत संकल्पनेला बळ दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांना सुलभ, जलद आणि परवडणारा न्याय मिळावा, या संविधानिक तत्त्वानुसार कोल्हापूर खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे. कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ही सुनावणी न्या. अरविंद कुमार आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर पार पडली. राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि ॲड. संदीप देशमुख यांनी युक्तीवाद केला. या सुनावणीत खंडपीठाने नमूद केले की, न्यायालये ही केवळ प्रशासकीय सोयीसाठी नसून नागरिकांच्या न्यायहक्कासाठी असतात. भौगोलिक अंतर, आर्थिक अडचणी आणि वेळेची मर्यादा यामुळे न्यायापासून वंचित राहणाऱ्या घटकांना जवळच्या ठिकाणी न्यायालय उपलब्ध करून देणे ही राज्याची आणि न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे, असे न्यायालयाने नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात संविधानातील समानता, न्यायप्रवेश आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा सविस्तर उल्लेख केला. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना शेकडो किलोमीटर प्रवास करावा लागू नये, हीच लोकशाही व्यवस्थेची खरी भावना असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. कोल्हापूर खंडपीठामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि परिसरातील जिल्ह्यांतील प्रकरणांची सुनावणी जलद होईल, यामुळे उच्च न्यायालयावरील ताणही कमी होणार आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वकील संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक वर्षांपासून कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा सुरू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे त्या संघर्षाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. न्यायप्रणाली ही केंद्रित न राहता विकेंद्रित असावी, जेणेकरून सामान्य माणसाला न्यायालय आपलेसे वाटेल, हा संदेश या निर्णयातून अधोरेखित झाला आहे. दरम्यान, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाशीध भूषण गवई यांनी घेतला होता. त्यांच्या हस्ते १८ ऑगस्टला सर्किट बेंचचे उद्घाटन झाले आणि कामकाजही सुरू झाले आहे.