पक्ष सर्वांचेच समाधान करू शकत नाही – छगन भुजबळ

नाशिक : महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाराजीनाट्य सुरु आहे. या पार्श्वभूमिवर मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचे नेते सर्वांचे समाधान करू शकत नाहीत. सत्तेत तीन पक्ष असल्याने नाराजी होणारच, असे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. भुजबळ म्हणाले, मला कोणतेही खाते दिले तरी चालेल. मला काय मिळणार याची मला कल्पना नाही. कृषीमंत्री पदाबद्दल मी काही ऐकले नाही. ते वर्तमान पत्रातून दिसले. तसेच महाराष्ट्र विकास आघाडी जिल्हा परिषद निवडणूक एकत्रित लढणार असा आदेश आहे, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकमधील मेट्रोला विरोध केलेला नाही. मुंबईची लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे तिथं मेट्रो आवश्यक आहे. मात्र नागपूरमध्ये मेट्रोचे काय झाले आहे ते बघावे. मेट्रोची आवश्यकता असेल तर करा. मात्र अभ्यास करून निर्णय घ्यावा, असेही भुजबळांनी सांगितले.
नाशिकमध्ये बससेवेबद्दल सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करावा हा नाशिकरांवरती टॅक्स बसणार आहे. त्यापेक्षा बस महामंडळाला पैसे दिले तर चांगले नाहीतर 100 कोटींचा भुर्दंड पडेल, असेही त्यांनी म्हटले.





