लग्न मालक राहिला बाजूला अन, वाढप्यांचीच पळापळ

सातारा – सातारा पालिका हद्दवाढ भागात मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून 48 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला. या निधीतून शाहूनगर, गोळीबार, विलासपूर, शाहूपुरी आदी भागातील विकासकामे मार्गी लागणार आहेत. मात्र, याचे श्रेय आपल्याला मिळावे म्हणून नारळफोड्या गॅंगने नारळ फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. या गॅंगची अवस्था म्हणजे लग्नातील वाढप्यांसारखी झाली आहे. लग्न मालक ज्याने सगळं केलं आहे, तो राहिला बाजूला अन, नुसती वाढप्यांचीच पळापळ सुरु आहे, असा खोचक टोला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना लगावला.
राज्य शासनाच्या 48 कोटी निधीमधून शाहूनगर, गोळीबार मैदान, विलासपूर, शाहूपुरी आदी भागात रस्ते, गटर, पथदिवे आदी विकासकामे हाती घेण्यात आली असून त्याचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक मोने, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक शेखर मोरे-पाटील, रवी ढोणे, विजय काटवटे, धनंजय जांभळे, शकील बागवान, राजू गोरे, शशिकांत पारेख, आनंदराव कणसे, फिरोज पठाण, नाना पवार, विजय देसाई, आशुतोष चव्हाण, व्यंकटराव मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, निधी मिळून सहा महिने उलटले पण, काही लोकांनी मर्जीतल्या ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठी निधी पडून ठेवला आणि या भागातील विकासकामे रखडवली. ज्यावेळी पालिकेत सत्ता होती. त्याकाळात हद्दवाढ भागासाठी सातारा विकास आघाडीने किती कामे केली? आता मुख्याधिकारी प्रशासक असून त्यांना मंजूर कामे तातडीने घेण्याच्या सूचना केल्या आणि आता ही रखडलेली कामे मार्गी लागत आहेत. मात्र, विरोधक स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत. मी जे काम केले आहे, तेच मी केले असे सांगतो. मी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय कधीच घेत नाही. आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यानी सत्ता काळात किती भ्रष्टाचार केला हे सर्वानीच उघड्या डोळ्यांनी पहिले आहे. त्यामुळे आता दुसऱ्यानी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडून उगाच शायनिंग करू नये. सातारा पालिका हद्दीतील अनेक विकासकामे येत्या काही दिवसात मार्गी लागणार आहेत. त्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केले आहेत. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विकासकामे मंजूर करून घेणार आहे.
यावेळी अविनाश कदम, फिरोज पठाण, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला संग्राम भोसले, दिगंबर महामूलकर, अंकुश कणसे, रवी पवार, प्रकाश घुले, सरपंच आप्पा पिसाळ, आबा जगताप, नाना चव्हाण, बाळासाहेब महामूलकर, युवराज जाधव, पप्पू घोरपडे यांच्यासह महिला, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.





