शाळा सुरू करण्यास संस्था सज्ज मात्र मुलांच्या उपस्थितीकडे लक्ष

पुणे – राज्य शासनाने येत्या सोमवारी नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्यातील बहुतांश शाळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व तयारी केली आहे. मात्र, मुलांची उपस्थिती कितपत राहील, याविषयी शाळा व संस्थाचालकांमध्ये सांशकता आहे.

राज्य शासनाने करोना परिस्थितीचा विचार करता शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे. शाळा सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी सर्व परिसर सॅनिटाइज करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे दिवसांतून दोनवेळा सॅनिटाइज करण्याचे नियोजन सुरू आहे. पालकांची बैठक घेऊन शाळेने काय काळजी घेत आहे, त्याची माहिती शाळेकडून देण्यात येत आहे.

शाळेचे सर्व प्रवेशद्वार खुले करण्यात येणार असून, सामाजिक अंतर राखत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. काही कालावधी निश्‍चित करून टप्प्याटप्प्याने इयत्तानिहाय शाळा सुटण्याविषयी वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. पालकांना हमीपत्र पाठवून, तसे संमती लिहून घेण्याची कार्यवाही शाळेने सुरू केली आहे.

पालकांकडून विरोध…
देशातील दिल्ली, हरयाणा, उत्तराखंड राज्यात शाळांमधून विद्यार्थी आणि शिक्षकांना करोनाची बाधा झाल्यामुळे पालक भयभीत झाले आहेत. त्यातच राज्यातील मुंबई, पुण्यात करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत नववी ते बारावीचे वर्ग सुरक्षित अंतराचे नियम पाळून सुरू करण्याची तयारी आहे. पण पालकांकडून शाळा सुरू करण्याला विरोध होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मुलांना शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात पाठवण्याची शक्‍यता कमी आहे.

मात्र, तरीही पुण्यात शाळा सोमवारपासून सुरू होत आहे. मुंबई आणि ठाणे महापालिकेने विद्यार्थी, शिक्षक, पालकांची सुरक्षितता लक्षात घेऊन, शाळा 31 डिसेंबरपर्यत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, पुणे महापालिका आणि जिल्हा परिषदेने शाळा सुरू करण्याची भूमिका घेतल्याने, पालक वर्गातून त्याला विरोध होतांना दिसत आहे.

पुणे विद्यापीठ गृहाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या मुक्‍तांगण स्कूल सोमवारी सुरू करण्यात येणार आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार सर्व तयारी संस्थेकडून करण्यात आली आहे. आता मुलांची किती उपस्थिती असेल, हा प्रश्‍न आहे.
– सुनील रेडेकर, कुलसचिव, पुणे विद्यापीठ गृह


करोना भीतीमुळे पालकांना मुलांना शाळेत पाठवण्याची इच्छा नाही. अशावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड शाळा सुरू करण्याचा निर्णय का घेत आहेत, याचे स्पष्टीकरण त्यांनी देण्याची गरज आहे. ऑफलाइन शिक्षण साहित्य उपलब्ध करून देणे, डीएड, बीएड उत्तीर्ण युवकांना मदतीस घेऊन छोट्या गटांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे, पालकांच्या शुल्काचा बोजा कमी करून इतर पर्यायी शैक्षणिक सुविधा देण्यास शाळांना भाग पाडणे, असे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– मुकुंद किर्दत, “आप’ पालक युनियन


शासनाच्या मार्गदर्शक सूचनांसह शाळा सुरू करण्यात येणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संस्थेच्या सर्व शाळा सॅनिटाइझ करण्यात येत आहे. परिसरात स्वच्छता वेळोवेळी होत आहे. शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून शाळा सुरू होतील. संस्थेने शाळा सुरू करण्याबाबत सर्व तयारी पूर्ण केली आहे.
– ऍड. एस. के. जैन, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळ


आम्ही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची टेस्टही झाल्या आहेत. शाळेत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग, ऑक्‍सिमीटर केले जाणार आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होणार आहे. मात्र, मुलांना शाळेत पाठविण्यासंदर्भात शनिवारी पालकांची बैठक होणार आहे. त्यानंतरच पालकांचा कसा प्रतिसाद आहे, हे स्पष्ट होईल.
– डॉ. मिलिंद नाईक, ज्ञानप्रबोधिनी शाळा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.