पुण्यातील जुना उड्डाणपूल पुढील 15 दिवसांत पाडणार

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 -चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल येत्या पंधरा दिवसात ब्लास्टिंग पद्धतीने पाडण्यात येणार आहे. त्यापूर्वी मुळशी, बावधन, कोथरूडसह महामार्गावरील वाहनांसाठी स्वतंत्र लेन तयार करण्यात येणार आहे. सध्या चौकातील वाहतूक कशाप्रकारे वळवता येईल, याबाबत प्रात्यक्षिकासह सर्व्हे केला जात आहे. यासाठी आवश्यक त्या सूचना देऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलीकस आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
चांदणी चौकातील उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरणामुळे ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे एनडीए, मुळशी, बावधनकडून कोथरूड आणि सातारला जाणाऱ्या वाहनांना चौकातून वळसा घालून महामार्गावरून पुढे जावे लागत आहे. तर कोथरूडकडून सातारा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. सध्या पर्यायी मार्ग उलब्ध नसल्यामुळे सर्व बाजूची वाहने चौकातील पुलाखाली एकत्र येतात. त्यामुळे महामार्गावरील वाहनांच्या रांगा लांबपर्यंत जातात. आता चौकातील जुना उड्डाणपूलही पाडल्यानंतर चारही बाजूने येणाऱ्या वाहनांच्या क्रॉसिंगची समस्या आणखी वाढविण्याची भीती आहे. त्यामुळे लेनचे नियोजन कसे होणार, असे प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
…म्हणून सतत होते कोंडी
पश्चिमेकडून येणाऱ्या 9 लेन रस्त्यांवरील वाहनांची संख्या चांदणी चौकाजवळ केवळ तीनच होत आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे लेनची संख्या वाढविणे आणि कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश आयुक्त विक्रमकुमार आणि डॉ. देशमुख यांनी दिले.
पुढचे पाऊल
वेदभवन वेदशाळेच्या जागेविषयी मनपाकडून सर्वोच्च न्यायालयात विशेष वकील नेमून स्थगिती आदेश रद्द करण्याविषयी विनंती करण्यात येईल. त्यामुळे सर्व्हिस लेनसाठी जागा मिळेल. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार
1 सप्टेंबरनंतर श्रृंगेरी मठ परिसरातील जागेचा ताबा मिळणार आहे. त्यानंतर सर्व्हिस रोड सुरू होण्यास मदत होणार आहे. तर मुळशी ते सातारा मार्गावरील चांदणी चौकातील डांबरीकरणाचे काम सात दिवसांत पूर्ण करून हा मार्ग खुला करण्यात येईल.





