पॅरिस -अमेरिकेत एकाच दिवसात करोनाने 3 हजारहून अधिक रूग्णांचा बळी घेतला. त्या दुर्दैवी आणि नकोशा उच्चांकामुळे अमेरिकेत करोनाने घेतलेल्या बळींच्या संख्येने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
जगभरात करोनाचा कहर चालू आहे. जगभरात 27 लाखांहून अधिक रूग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत 1 लाख 92 हजारांहून अधिक रूग्ण दगावले आहेत. संपूर्ण जगापुढे उभ्या राहिलेल्या करोना संकटाचा सर्वांधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्या देशातील करोनाबाधित आणि बळींची संख्या जगात सर्वांधिक आहे. अमेरिकेतील बाधितांची संख्या 9 लाखांजवळ जाऊन ठेपली आहे.
त्या देशातील बाधितांचे प्रमाण जगाच्या सुमारे एक-तृतीयांश तर मृतांचे प्रमाण जवळपास एक-चतुर्थांश इतके आहे. अमेरिकेपाठोपाठ इटलीत 25 हजार मृतांची नोंद झाली आहे. स्पेन आणि फ्रान्स या देशांतही 21 हजारांहून अधिक रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. ब्रिटनमध्ये ती संख्या 18 हजारांवर गेली आहे. बेल्जियम, इराण आणि जर्मनीत 5 हजारहून अधिक रूग्ण दगावले आहेत.
खंडनिहाय विचार करता युरोपला करोनाने सर्वांत जास्त तडाखा दिला आहे. युरोपमधील बाधितांचे प्रमाण जगाच्या जवळपास निम्मे आहे. तर, त्या खंडात करोनाने जगातील एकूण बळींपैकी सुमारे दोन-तृतीयांश बळी घेतले आहेत. जगातील 210 देश आणि प्रदेशांमध्ये करोना विषाणूचा फैलाव झाला आहे.