शेवगाव -तालुक्यातील राणेगाव शिंगोरी येथे कल्याणहून आलेल्या करोनाबाधिताच्या सहकाऱ्याचा तसेच शहरटाकळीच्या बाधित माहिलेच्या पतीचा व भांडूप येथून शेवगावी आलेले घोटण येथील पती-पत्नी पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने शेवगाव तालुक्यातील बाधिताची संख्या सातवर पोहचली. बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी ती सारखी वाढत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. तालुक्यातील राणेगाव येथे दोघेजण कल्याणहुन घरी गावी आले होते.त्यातील एकाला रात्री अस्वस्थ वाटत असल्याने दोघेही पहाटेच नगर येथील सिव्हिल रुग्णालयात गेले. तेथे त्याची तपासणी केली असता रात्री उशिरा तो पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. म्हणून त्याच्या साथीदारासह बाधित युवकाचे आई, वडील, आजी, पत्नी, दोन मुले, बहीण व तीची दोन मुले, भाऊ, भावजयी या सर्वांची नगरला सिव्हिल रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यापैकी त्याचा साथीदार बाधित असल्याचा अहवाल आला आहे. शहरटाकळी येथील करोनाबाधित महिलेच्या पतीचा दमा उसळल्याने त्यास तसेच भांडूपहून गावी आलेल्या व सध्या शेवगावातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सहकुटुंब क्वॉरंटाईन केलेल्या पती-पत्नीला बुधवारी तपासणीसाठी नगरच्या सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी हे तिघे पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तहसीलदार अर्चना भाकड यांनी बाधिताच्या संपर्कातील पाच जणांना तसेच शेवगावच्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयातील सहा आणि बोधेगाव येथील दोन अशा तेरा जणांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी नगरला पाठविले. बाधिताच्या जवळच्या तीन वस्त्या व राणेगावच्या सीमा सील करण्यात आल्या असून वस्त्यावरील सर्व नागरिकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. 571 व्यक्ती विलगीकरण कक्षात तालुक्यात आजअखेर 2005 व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात आले असून दहा दिवसानंतर त्यातील 1434 व्यक्तींना घरी पाठवण्यात येऊन त्यांच्याच घरी सात दिवस होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. सध्या तालुक्यात ठिकठिकाणी 571 व्यक्ती विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या आहेत. कायद्यापेक्षा स्वयंशिस्त महत्वाची आहे. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा, वृध्दांना व बालकांना जपावे. अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे. नियमाचं पालन करुन प्रशासनाला सहकार्य करा. अर्चना भाकड , तहसीलदार शेवगाव