परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती लाभार्थ्यांची संख्या २०० करावी,युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रथमेश आबनावे यांची मागणी

पुणे : परदेशांत शिक्षण घेण्यास जाण्यासाठी अनुसूचित जातीच्या मुलामुलींना दिली जाणारी शिष्यवृत्ती त्वरित वितरित करावी, तसेच शिष्यवृत्ती धारकांची संख्या ७५ वरून २०० करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश आबनावे यांनी केली. विद्यार्थ्यांना प्रवेशात, तसेच व्हिसा मिळवण्यात अडचणी येत असल्याने यावर लवकरात लवकरकार्यवाही करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही आबनावे यांनी दिला.
राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेऊन आबनावे यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच या मागणीचे निवेदनही दिले. विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी आणि योजनेचा भाग असलेले आगाऊ खर्च (ॲडव्हान्सेस), विमान शुल्क मिळावे, असेही या निवेदनात म्हटले आहे. सहआयुक्त भारत केंद्रे आणि इतर अधिकाऱ्यांशीही त्यांनी याबाबत चर्चा केली.
प्रथमेश आबनावे म्हणाले, “विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळाली नाही, तर त्यांच्या प्रवेशाला अडचणी येत आहेत. एकप्रकारे शिक्षणाची संधी डावलण्याचाच हा प्रकार आहे. ही प्रक्रिया अधिक गतिमान होण्यासाठी, तसेच लोकाभिमुख आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून यासंदर्भात जनजागृती करावी. त्यातील क्लिष्ट अटी काढून ती अधिक सुलभ व पारदर्शक करावी. विद्यार्थी-पालकांना योग्यप्रकारे मार्गदर्शन व संवाद करावा, ऑनलाईन वेबपोर्टलमार्फत अर्ज मागवणे तसेच यासंदर्भातली ऑनलाईन पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ही मागणी केली.”
आयुक्त नाईकनवरे यांनी या निवेदनाची दखल घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली व तातडीने यावर तोडगा काढण्याचे निर्देश दिले. वेळेत शिष्यवृत्तीचे वाटप, तसेच संख्या वाढवण्याबात सकारात्मकपणे विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे आबनावें यांनी सांगितले.

