अमेरिकेतील करोनाबळींची संख्या दीड लाखावर

वॉशिंग्टन -करोना संकटाचा जगात सर्वांधिक फटका बसलेल्या अमेरिकेला अजूनही दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. त्या देशातील करोनाबळींच्या संख्येने आता दीड लाखाचा टप्पा ओलांडला आहे.

जगभरातील 213 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. जगभरात 1 कोटी 72 लाखांहून अधिक करोनाबाधित आहेत. करोना संसर्गाने आतापर्यंत जगात सुमारे 6 लाख 72 हजार बाधितांचा बळी घेतला आहे.

जगात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद अमेरिकेत झाली आहे. त्या देशात 45 लाखांहून अधिक बाधित आहेत. ते प्रमाण जगाच्या एक-चतुर्थांश इतके आहे. बाधित आणि बळींच्या संख्येत जागतिक क्रमवारीत ब्राझील दुसऱ्या स्थानी आहे. त्या देशात 25 लाखांपेक्षा अधिक बाधित आहेत.

तर ब्राझीलमध्ये आतापर्यंत 90 हजारांहून अधिक बाधित दगावले आहेत. बाधित संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. सर्वप्रथम चीनमध्ये मागील वर्षाच्या अखेरीस करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर तो विषाणू जगभरात फैलावला.

चीनने त्या फैलावावर नियंत्रण मिळवल्याचे चित्र होते. मात्र, तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर त्या देशात सलग दोन दिवस 100 हून अधिक नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे करोना नियंत्रणात चीनला मिळालेल्या यशाविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.