मुंबई – कोरोनाच्या संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 4, पुणे 1, व सोलापूर शहर 1, नाशिक ग्रामीण 1 अशा 7 पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात आतापर्यंत 106 पोलीस अधिकारी व 901 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून राज्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या ही 1 हजार 007 वर पोहचली आहे. राज्यात पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांवर उपचार सुरू असून पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन देखील सरकारकडून करण्यात येत आहे.