कोरोनाबाधितांची संख्या साठवर

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 60 वर पोहोचली आहे. दिल्ली आणि जयपूरमध्ये नव्याने एका रुग्णाची वाढ झाली.
दिल्लीत आता पर्यंत पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली असून उत्तर प्रदेशात नऊ जणांना बाधा झाल्याचे बुधवार सकाळपर्यंत स्पष्ट झाले होते. कर्नाटकात चार जणांणा बाधा झाली असून महाराष्ट्रात पाच जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर लडाखमधील दोन हजण कोरोनाग्रस्त झाले आहेत. या 60 बाधीतांमध्ये 16 इटालीयन नागरिकांचा समावेश आहे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
राजस्थान, तेलंगणा, तामिळनाडू, जम्मू काश्मिर आणि पंजाबमध्येही प्रत्येकी एक बाधीत आहे. केरळमध्ये बाधीतांची संख्या नऊवर पोहोचली असून त्यात बरे होऊन घरी परतलेल्या तीघांचा समावेश आहे. मेदांत आणि सफदरजंग रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांशी आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. त्यांची प्रकृती स्थीर असून ते बरे होण्याच्या मार्गावर असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सध्या वापरत असलेल्या आचार संहितेनुसार संशयितांची दोनदा चाचणी घेऊन त्यानंतर त्यांना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे भअरताने फ्रान्स. जर्मनी आणि स्पेन या आणखी तीन देशातील नागरिकांना येण्यास प्रवेशबंदी जारी केली आहे. 11 मार्चपर्यंत वितरीत केलेले सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मंगळवारी रात्री याबाबत अधिसूचना काढण्यात आली.
चीन, हॉंगकॉंग, रिपब्लिक ऑफ कोरीया, जपान इटली, थायलंड, सिंगापूर, इराण, मलेशिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीत जाऊन आलेल्या नागरिकांनी 14 दिवस घरातच एकट्याने रहावे. त्यांना घरातून काम करण्याची परवानगी द्यावी, अशी शिफारस आरोग्य मंत्रालयाने केली आहे. भारताने यापुर्वी इटली, इराण, द. कोरीया, जपान आणि चीन मधील नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. तसेच या देशांत प्रबास करू नये. या काळात अनावश्यक प्रवास करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.





