मुंबई – एअर इंडिया कंपनीने एअरबस या विमान निर्माण करणार्या कंपनीकडे आणखी 100 विमानाची ऑर्डर दिली आहे. यामध्ये 10 मोठ्या आकाराची ए 350 जातीची विमाने आणि 90 छोट्या आकाराची ए 320 जातीची विमाने आहेत. गेल्या वर्षी एअर इंडिया कंपनीने एअरबस आणि बोईंग या कंपन्याकडे 470 विमानाचे ऑर्डर दिली होती. त्यानंतर आता पुन्हा 100 विमानाची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे ऑर्डर दिलेल्या एकूण विमानाची संख्या 570 झाली आहे. एअर इंडिया कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार या कंपनीने एअरबस कंपनीबरोबर ए 350 विमानाच्या देखभाल आणि उपकरण पुरवठ्याबाबत सामंजस्य करार केला आहे. एअर इंडिया कंपनीचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी सांगितले की, जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात विमानाने प्रवास करणार्यांची संख्या वेगात वाढत आहे. त्याचबरोबर विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधा वेगाने विकसित होत आहेत. भारतातील तरुणांची परदेशात जाण्याची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत भारतातील विमान कंपन्यांना विस्तारीकरणाचे काम हाती घ्यावे लागत आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही विमानांची संख्या वाढविता आहोत. या खरेदीमुळे एअर इंडिया जागतिक पातळीवरील नागरी विमान वाहतूक कंपनी होण्यास मदत मिळणार आहे. विमानाच्या देखभालीचा प्रश्न कमी करून कार्यक्षमता वाढविण्यावर आमचा भर राहणार आहे. त्यामुळे विमाने कमीत कमी प्रमाणात वापराविना पडून राहतील.