Pimpri : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला

भोसरी : पिंपरी चिंचवड शहरात मोकाट आणि कुपोषित जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या जनावरांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्यांवर गाय, वासरं, वळू यांच्यासह कुत्र्यांचा मुक्त वावर असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचत आहे.
शहरातील अनेक भागांत सकाळच्या वेळेस जनावरे मोकाट सोडण्यात येतात व रात्री परत बांधली जातात. दरम्यान, दिवसभर ही जनावरे अन्नाच्या शोधात बाजारपेठा, मंडई, गल्ल्या व वसाहतींत फिरत असतात. पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे कुपोषित झालेली ही जनावरे अधिक चिडचिडी झाली होत आहेत. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास नागरिकांवरच धावून जातात. त्यामुळे त्यांना हटकण्याचीही भीती सर्वसामान्यांना वाटते.
महत्त्वाच्या रस्त्यांवर म्हणजे पिंपरीगाव, यमुनागनर-निगडी, भोसरी, थेरगाव, पिंपळे गुरव अशा विविध ठिकाणी या जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. कॉलनीत नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या उरलेल्या अन्नावर ही जनावरे आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे जनावरांच्या मालकांना चारा, वैरणीचा खर्च न करता मोकाटपणे जनावरे पाळण्याचा शिरस्ता तयार झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत हजारो मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री आहेत.
कचरा साचलेल्या ठिकाणी अनेकदा ही मोकाट जनावरे अन्नासोबतच प्लास्टिकही खातात. त्यामुळे त्यांचे आरोग्य खराब होते. याच्याहून दुर्दैवाची बाब म्हणजे रात्री अपरात्री कसाई या गोवंशाची चोरी करतात. निर्जन भागात जाऊन या गोवंशाची कत्तल केली जाते. अशा अनेक घटना पिंपरी चिंचवड शहरात यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे अनेकदा तणावाचेही वातावरण निर्माण झाले होते.
पिंपरी चिंचवड शहरातील वाढता जनावरांचा उपद्रव लक्षात घेता, तातडीने ठोस उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक बनले आहे. अन्यथा ही कुपोषित जनावरे नागरिकांच्या जिवाला धोका ठरू शकतात. यामुळे राजकीय पातळीवरही ठिकठिकाणी मोकाट जनावरांसाठी गोशाळा उभारावी, अशी मागणी राजकीय नेतेमंडळी करताना दिसत आहेत.
शाळेजवळही जनावरांचा गोठा
खराळवाडी, पिंपरी येथील एका नामांकित खासगी इंग्रजी शाळेजवळही जनावरांचा गोठा आहे. तात्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पाहणी करताना या भागातील गोठा हलविण्याबाबत अधिकारी वर्गाला सूचना केल्या होत्या. मात्र काही दिवसातच त्यांची बदली झाल्याने हा विषयही मागे पडला.
सोशल मीडियामुळे भितीमध्ये वाढ
काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. याबाबतची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियामध्ये व्हारयल झाली आहे. तसेच विविध वृत्तवाहिन्यांमध्येही ही घटना दाखविण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी दोन वळूंमध्ये झुंज लागल्याच्याही व्हिडिओ क्लीप व्हायरल होत आहे. अशावेळी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांचेही नुकसान होते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व मुलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे.
यापैकी अनेक जनावरे कुपोषित अवस्थेत आहेत.
मुख्य रस्त्यांवर या जनावरांचा मुक्त वावर आहे.
अन्नाच्या शोधात ही जनावरे बाजार व वस्तीत फिरतात.
भुकेल्या जनावरांमधून हिंस्र प्रवृत्ती वाढत आहे.
नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत.





