कुख्यात गुंड अनिकेत चौधरी टोळीला मोक्‍का 

पिंपरी – कुख्यात गुंड अनिकेत चौधरी टोळीतील 13 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का)ची कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्यास सुरवात केली आहे.

अनिकेत अर्जुन चौधरी (वय 22) सुमित अतुल पंडित (वय 23), अभिजित दिलीप टेकाळे (वय 19), ओंकार नाना चंदनशिवे (वय 18, सर्व रा. थेरगाव), जुबेर युनूस खान (वय 20), अक्षय सिकंदर गंगावणे (वय 21), परश्‍या सुनील माने (वय 20), नाथा भीमराव शिंदे (वय 21, सर्व रा. वाकड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींसह त्यांच्या आणखी पाच साथीदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत चौधरी हा टोळीप्रमुख आहे. त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या टोळीकडून अनेक गुन्हे करून घेतले आहेत. त्याच्या टोळीवर गर्दी मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे जवळपास सात गुन्हे दाखल आहेत. अनिकेत चौधरी याच्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पहिली एमपीडीए कारवाई ऑक्‍टोबर 2018 मध्ये करण्यात आली. त्यानंतर देखील त्याने थेरगाव परिसरात त्याच्या साथीदारांसह धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण केली आहे. आरोपी सुमीत याच्यावर सहा, परश्‍यावर तीन, जुबेर, अक्षय, अभिजित यांच्यावर दोन गुन्ह्यांची नोंद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.