मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जर आपण गाफील राहिलो तर, मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल, असे मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत. एकदा मुंबई हातातून गेली तर आपल्याला कोणालाही काही जमणार नाही. हातातून मुंबई गेली तर हे लोक थैमान घालतील असे म्हणत राज ठाकरेंनी नाव न घेता सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात ठाकरे बोलत होते. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रनधुमाळी सुरू आहे. दरम्यान विरोधकांकडून सातत्याने निवडणूक याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा केला जातोय. याबाबत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. ठाकरे म्हणाले, रात्र वैऱ्याची आहे त्यामुळे गाफील राहू नका. मतदार याद्या तपासून पाहा. थोडे दिवस थांबा भाषणे सुरुच होतील. मला फक्त जाता जाता एवढीच गोष्ट सांगायची आहे की, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, मतदार याद्यांमध्ये जे काही सुरू आहेत त्यावरती लक्ष ठेवा. मतदार खरे आहेत, खोटे आहेत याच्यावरती पण तुमचे लक्ष असणे गरजेचे आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांनंतर लगेचच महापालिका निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे.