दुसऱ्या दिवशीही वाई पालिकेची सभा तहकूब

प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पळवाट शोधण्याचा प्रयत्न
वाई – सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या निवडीमध्ये झालेला पराभव जिव्हारी लागल्यानेच तीर्थक्षेत्र विकास आघाडी तो पराभव विसरायला तयार नाही. या निवडी चुकीच्या असल्याने तीर्थक्षेत्रने आयुक्तांकडे धाव घेवून या समित्या रद्द करण्यासाठी अपिल केले आहे. त्यामुळेच दोन्ही आघाड्यांमध्ये एकोपा न करताच मुख्याधिकारी गैरहजर असल्याचे कारण पुढे करत बुधवारी पुन्हा बोलविण्यात आलेली सर्वसाधारण सभा तहकूब करीत दोन्ही आघाड्यांनी एकत्रित पत्र तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रभारी अधिकाऱ्याची मागणी करण्यात येण्याचे नाटक करीत सभा तहकूब ठेवण्यात धन्यता मानली.
मुख्याधिकारी यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता मी सध्या वैद्यकीय रजेवर असून याची कल्पना दोन्हीही आघाड्यांना दिल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. तसेच सर्वसाधारण सभेला मुख्याधिकारी गैरहजर राहिल्यास कार्यालयीन अधीक्षक पिठासन अधिकारी म्हणून सभेची जबाबदारी सांभाळू शकतो, त्यासाठी लेखी परवानगीची गरज नाही. या आधी मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत अशा अनेक वेळा सर्वसाधारण सभा पार पडल्या आहेत. त्यावेळी दोघांनीही कोणतीही तक्रार दाखल केली नाही.
एकंदरित दोन्ही आघाड्यांना जनतेच्या प्रश्नाशी कोणतीही बांधिलकी नसल्याचे सभा तहकूब करून हे अधोरेखित होत आहे. बोलविण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रभागातील कामांचे विषय मंजूर करून वाई विकास महाआघाडीच्या प्रभागातील कामाचे विषय मतदानावर फेटाळून लावण्याचा घाट घालणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीलाच मतदानावर विषय फेटाळून लावण्याची खात्री नसल्यानेच सभा तहकूब ठेवण्यावरच समाधान मानले. कालच्या सभेत जाणीवपूर्वक प्रशासनाला धारेवर धरत आमचा अभिनंदनाला विरोध नसून चुकीचा पायंडा पाडला जावून वाईकर नागरिकांची दिशाभूल करण्यात येवू नये अशी भूमिका घेणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीतच मतभेद असल्याचे स्पष्ट दिसत आहे.





