पुणे – अवकाळी पावसाने नको-नको केले असताना शहर व परिसर शनिवारी दाट धुक्यात हरवला होता. त्याचबरोबर थंडीचीदेखील चाहुल लागली आहे. सकाळी पडलेले दाट धुके, थंडी आणि दव असा अनुभव नागरिकांना आला. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत असे दृश्य शहर व परिसरात होते.
जिल्ह्यात अवकाळी परिसराने धुमाकूळ घातला होता. विधानसभा निवडणूक मतदान आणि दिवाळीदेखील पावसाच्या सावटाखाली झाली. नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहुलही न लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर व परिसरात थंडीची चाहुल लागली असून, धुकेदेखील पडत आहे.
सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरल्याने पंधरा-वीस फुटांवरील काही दिसत नव्हते. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांना दिवे सुरू ठेवावे लागले. बच्चे कंपनीला हा अनुभव नवा असल्याने, हे दृश्य पाहिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव दिसत होता. आकाशातील ढग जमिनीवर उतरल्याचा भास होत असल्याचे दृश्य पहायला मिळाले. निसर्गाचे हे अद्भूत रुप नागरिकांनी डोळ्यांत साठवण्यासारखे होते. दहा वाजल्यानंतर सूर्यदर्शन झाल्यानंतर धुके विरले.
तापमान आणखी घटणार
तापमानात घट होऊन शहरात थंडी जाणवत आहे. दरम्यान, सध्या हवामान कोरडे असल्यामुळेच आगामी काळात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गुरुवारी शहरातील किमान तापमान 19 अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी ते 18, तर शनिवारी आणखी घट होऊन 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. दुसऱ्या बाजूला दुपारी मात्र उन्हाचा कडाका जाणवत आहेत. कमाल तापमानात सुद्धा तितकीच वाढ होत आहे. शनिवारी शहरातील कमाल तापमान हे 31 अंश होते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कमाल तापमानात वाढ होणार असून किमान तापमान हे 17 ते 18 अंशांपर्यंत राहणार आहे.