Pimpari : नवीन सेवा रस्ता बनला वाहनतळ !

कान्हे : नायगाव ते कामशेत दरम्यान सातत्याने होणारे अपघात आणि स्थानिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वारंवार केलेल्या मागणीनंतर आयआरबी प्रशासनाकडून नवीन सेवा रस्त्याची निर्मिती करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वीच या कामाला सुरूवात झाली असून नायगाव ते कामशेत दरम्यान दोन्ही मार्गिकेजवळ रस्त्याची निर्मिती होत आहे.
दरम्यान नव्याने निर्माण होत असलेल्या सेवा रस्त्यावर महामार्गालगतच्या व्यापाऱ्यांकडून बेकायदा वाहन पार्किंग केले जात असल्याने सामान्य नागरिकांसह वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून सेवा रस्त्यावर अवैधरित्या जागा अडविणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
नायगाव येथे नव्याने झालेल्या झालेल्या सर्विस (सेवा) रोडवर जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत दुकाने असणाऱ्या व्यापाऱ्यांची वाहने दिवसभर उभी असतात, यामुळे सेवा रस्ता बनवून देखील त्याचा वापर नागरिकांना करता येत नाही. तसेच पुन्हा धोकादायकरित्या मुख्य रस्त्यावर यावे लागत असल्याने अपघाताचा धोका संभवतो. यामुळे सेवा रस्त्यावर विनादिक्कत वाहने उभी करून रस्ता अडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
रस्ता असून नसल्यासारखा…
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी बनवित असलेला हा नवा रस्ता अवजड वाहने, व्यवसायिकांची वाहने यामुळे अडवला जात असल्याने रस्ता बनवूनही न बनविल्यासारखी परिस्थिती नागरिकांसाठी झाली आहे. दिवसभर येथे अवजड वाहने, दुकानदारांची वाहने थेट रस्त्यावर उभी केली जातात, मग हा रस्ता बनविला तो नागरिकांसाठी की येथील व्यवसायिकांच्या वाहनांसाठी असा सवाल उपस्थित होत आहे.
रस्त्याचा वापर वाहने पार्क करण्यासाठी
नायगाव हद्दीतील विविध दुकानदारांची वाहने, येथे येणारी अवजड वाहने, मालवाहू वाहने बेशिस्तपणे थेट नवीन सेवा रस्त्यावर उभी केली जातात. काही वाहने तासनतास रस्त्यावर मधोमध उभी करून ठेवली जातात. त्यामुळे सेवा रस्ता बनवून देखील त्याचा वापर करणे सामान्य नागरिकांना शक्य होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे सेवा रस्त्याला हक्काचा वाहनतळ बनविणाऱ्या व्यापारी, व्यावसायिक अथवा दुकान मालकांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धडक कारवाईची मागणी
सेवा रस्त्याअभावी आजवर झालेल्या अनेक अपघातात निष्पाप नागरिकांचे जीव गेले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी सातत्याने केलेली आंदोलने, प्रशासनास दिलेली निवेदने यानंतर आयआरबी प्रशासनाने नवीन सेवा रस्त्याची निर्मिती नायगाव ते कामशेत दरम्यान करण्याचे काम हाती घेतले. दरम्यान नायगाव येथे बांधण्यात आलेल्या नवीन सेवा रस्त्यावर महामार्गालगतचे दुकानदार, व्यावसायिक हे बिंधास्तपणे दिवसभर वाहने पार्क करीत आहेत. यातून सेवा रस्ता अडवला जात असून रस्त्याचा उपयोग स्थानिकांना करता येत नाहीये, त्यामुळे सेवा रस्त्यावर अवैधरित्या जागा अडविणाऱ्या संबंधितांवर कडक आणि धडक कारवाई आयआरबी प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नायगाव येथील नवीन सेवा रस्ता हा अपघात शून्य व्हावेत आणि स्थानिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी बनविण्यात आला. परंतु सध्या हा रस्ता महामार्गालगतच्या दुकानदारांसाठी हक्काचे पार्किंग बनलाय. संबंधित प्रशासनाने अशा वाहन चालक, मालक आणि संबंधित व्यवसायिकांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
– महेश चौधरी, पोलीस पाटील, नायगाव
नायगावच्या सेवा रस्त्यावर दिवसभर वाहने लावून ठेवली जातात. त्यामुळे अनेकदा प्रवासी, नागरिक, सामान्य वाहन चालक आणि व्यापाऱ्यांत वाद होतात. तरी संबंधित प्रशासनाने यात लक्ष घालून सेवा रस्ता दिवसभर वाहतुकीसाठी मोकळा राहावा, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी.
– नवनाथ चोपडे, ग्रामस्थ, नायगाव





