Jana Nayagan Release Date: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती यांचा बहुचर्चित चित्रपट ‘जन नायकन’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजयच्या अभिनय कारकिर्दीतील हा शेवटचा चित्रपट मानला जात असल्याने चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. आता या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत नवी माहिती समोर आली आहे. सुरुवातीला ‘जन नायकन’ हा चित्रपट ९ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे चित्रपटाची रिलीज पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता नव्या रिपोर्टनुसार, काही तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाची रिलीज डेट १९ जून दाखवली जात आहे. ‘डिस्ट्रिक्ट’ आणि ‘बुक माय शो’सारख्या प्लॅटफॉर्मवर जून महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे अपडेट दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण झाला आहे. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. Jana Nayagan चित्रपटाचे निर्माता वेंकट के नारायण नुकतेच एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्ही अजूनही सेन्सॉर सर्टिफिकेटची वाट पाहत आहोत. लवकरच प्रमाणपत्र मिळेल अशी अपेक्षा आहे. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर लगेच रिलीज डेट जाहीर केली जाईल आणि चित्रपट जगभर मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित केला जाईल.” ‘जन नायकन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन एच विनोथ यांनी केले आहे. चित्रपटात विजयसोबत पूजा हेगडे, ममिता बैजू आणि बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विजयच्या राजकीय प्रवासामुळे हा त्यांचा शेवटचा अभिनय असलेला चित्रपट मानला जात आहे. त्यामुळे ‘जन नायकन’कडे केवळ तमिळ प्रेक्षकच नव्हे तर संपूर्ण देशातील सिनेरसिकांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट कधी जाहीर होणार, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे.