पुणे: बांधकाम क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या आणि गुणवत्तापूर्ण निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारणाऱ्या ‘ए वन ग्रुप’ने आता आपली ओळख बदलून ‘युगम रिअल्टी’ या नवीन ब्रँड नावाने काम करण्याची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण बदलासह कंपनीने ‘Foundation to Future’ ही नवी टॅगलाईनही जाहीर केली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय कणेकर यांनी ही माहिती देताना सांगितले की, ‘युग’ या संस्कृत शब्दापासून निर्माण झालेल्या ‘युगम’चा अर्थ आहे, ‘या काळात घडणारे सर्वोत्तम’. पूर्वीची “Working Together Works” ही टॅगलाईन जपत, ग्राहकांसाठी उत्तम घडविण्याच्या एकत्रित भावनेने काम करण्याच्या तत्त्वाचा विस्तार ही नवी ओळख दर्शवते. १२ लाख चौरस फूटांहून अधिक बांधकाम; ५००० हून अधिक समाधानी ग्राहक नाव बदलले असले तरी कंपनीची बांधकाम आणि गुणवत्ता जतन करण्याची परंपरा कायम असल्याचे कणेकर यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत समूहाने पुणे आणि मुंबई महानगरांमध्ये १२ लाख चौरस फूटांहून अधिक निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र विकसित केले आहे. कंपनीशी ५,००० हून अधिक समाधानी ग्राहक जोडले गेले असून, सध्या कंपनीचे ७ प्रकल्प सुरू आहेत, तर १६ नवीन प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोसायटी पुनर्विकासात दमदार कामगिरी, आता देशभर विस्ताराचे नियोजन युगम रिअल्टीने मागील आठ वर्षांपासून गृह सोसायटी पुनर्विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, सातत्याने प्रकल्प उभारणीमुळे सोसायटी धारकांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला आहे, असे कणेकर यांनी सांगितले. याच यशाच्या बळावर युगम रिअल्टीने आता बेंगळुरूसह देशातील इतर महानगरांत विस्ताराचे नियोजन सुरू केले आहे. विशेष म्हणजे, कंपनीने यापूर्वी श्रीलंकेतील कोलंबो येथे यशस्वीरित्या प्रकल्प पूर्ण केले असल्याने कंपनीकडे आंतरराष्ट्रीय अनुभवदेखील आहे. “पुणे-मुंबईतील ग्राहक, सल्लागार, एजन्सी, विक्रेते आणि हितचिंतकांनी दिलेला विश्वास आमची सर्वात मोठी शक्ती आहे. तोच विश्वास ‘युगम रिअल्टी’सह अधिक दृढ होईल,” असा विश्वास संजय कणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.