“नव्या पिढीने जनतेशी बांधिलकी ठेवावी” ; अर्ज दाखल केल्यानंतर युगेंद्र पवारांना शरद पवारांचा मोलाचा सल्ला

बारामती : राज्यात काही मतदारसंघात मविआच्या दोन घटक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अजून अवकाश आहे. दरम्यानच्या काळात सगळे व्यवस्थित झालेले दिसेल. शिवाय राष्ट्रवादीचे उर्वरित जागा वाटप आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आजच जाहीर करतील अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
बारामतीतील मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, बारामतीत युगेंद्र यांच्या रुपाने मविआने तरुण उमेदवार दिला आहे. ते उच्चशिक्षित पदवीधर आहेत. परदेशात त्यांचे शिक्षण झाले आहे. प्रशासन, व्यवसायातील त्यांना माहिती आहे. विशेषतः साखर धंदा, ऊसाचे पिक यातील ते जाणकार आहेत. बारामतीची जनता या नेतृत्वाचा स्विकार करेल अशी माझी खात्री आहे, असे पवार म्हणाले.
युगेंद्र यांना काय कानमंत्र द्याल या प्रश्नावर ते म्हणाले, मी स्वतः गेल्या ५७ वर्षांपूर्वी बारामती तहसील कार्यालयात स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होतो. त्या दिवसापासून जनतेने मला सातत्याने निवडून दिले. ५७ वर्षे मी लोकप्रतिनिधी आहे. याचे कारण जनतेशी बांधिलकी हे आहे. मी नव्या पिढीला एकच सल्ला देईल की त्यांनी जनतेशी बांधिलकी ठेवावी. विनम्रता ठेवावी. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने संधी दिल्यानंतर ती विनम्रतेने स्विकारून त्यासाठी सातत्याने जागरुक रहावे.
राज्यात मविआने काही ठिकाणी दोन अर्ज दाखल केले आहेत. घटक पक्षांचेही अर्ज आहेत. परंतु यामध्ये आम्ही एकत्रित मार्ग काढू. अर्ज मागे घेण्यासाठी अजून अवधी आहे. बहुसंख्य जागांवर एकमत झाले आहे. काही जागांबाबत अडचणी आहेत, तेथेही निश्चित मार्ग निघेल.
मविआत कोण किती जागा लढवेल हे मला माहित नाही. आमचे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष ते काम पाहतात. उरलेली यादी ते आज जाहीर करतील.
लाडकी बहिण योजनेमुळे महायुती सत्तेवर येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर बोलताना पवार म्हणाले, निवडणूकीला उभा राहणारा प्रत्येकजण मी निवडून येणार असे म्हणत असतो. गेली अनेक वर्षात त्यांच्याकडे सत्ता होती. त्या काळात त्यांना बहिणीची आठवण झाली नाही. लोकसभेला जनतेने नाकारल्यावर बहिण-भाऊ आठवू लागले. त्याचे कारण लोकांनी धडा शिकवला.
बारामतीतून लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले होते. विधानसभेला काय घडेल यावर बोलताना पवार म्हणाले, बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तेवढी माहिती काही मर्यादित लोकांनाच असेल. बारामतीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. १९६५ पासून मी आजवर इतक्यांदा उभा राहिलो. सुरुवातीला काही निवडणूकांना मी इथे प्रचाराला येत होतो. नंतर तर ती जबाबदारी बारामतीकरांनीच घेतली. या निवडणूकीतही ते मविआच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील.





