Pune : नव्या शैक्षणिक धोरणामुळे भावी पिढी विचार प्रवर्तक होईल

पुणे : भारतीय ज्ञान परंपरा हा विज्ञान, तत्वज्ञान आणि अध्यात्मज्ञानाचा संगम आहे. ब्रिटिश सत्तेने भारतीयांना या ज्ञान परंपरेपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आता नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश करण्यात आला असून, त्यातून भावी पिढी विचार प्रवर्तक होऊन भारत महाशक्ती होण्यास मदत मिळेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी गुरुवारी व्यक्त केला.
भूषण पटवर्धन व इंदू रामचंदानी लिखित “जिनोम टू ओम’ या पुस्तकावरील परिसंवादाचे आयोजन करण्याताले होते. पुणे पुस्तक महोत्सवात “लिटररी कॉर्नर’ येथे आयोजित या परिसंवादात ज्येष्ठ तत्वज्ञ शरद देशपांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सिम्बायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, लेखक भूषण पटवर्धन यांनी सहभाग घेत आपली भूमिका मांडली.
युरोपात प्रबोधनयुगात विज्ञान-अध्यात्म हा भेद निर्माण झाला. ब्रिटिशांची सत्ता आल्यावर भारतीय विज्ञानाकडे झुकले आणि अध्यात्माची परंपरा विसरले. आधुनिक काळात या दोन्हीचे महत्त्व अधोरेखित झाल्याने हा भेद मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे देशपांडे म्हणाले. यावेळी कुलगुरू डाॅ. गोसावी आणि डॉ. करमळकर यांनीही मार्गदर्शन केले. “विज्ञानातून तत्वज्ञानाकडे प्रवास मांडणारे हे पुस्तक सर्व वयोगटातील वाचकांनी वाचले पाहिजे,’ असे डॉ. विद्या येरवडेकर म्हणाले. .





