NEET Paper Leak Scandal : नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात सीबीआयने धक्कादायक खुलासे केले आहेत. या पेपरी फुटी प्रकरणाचा मास्टरमांईड पी. व्ही कुलकर्णी याला अटक करण्यात आली. यानंतर गेल्या २४ तासांत देशभरातील सहा ठिकाणी छापेमारी करत सीबीआयने पुण्यातील वनस्पतीशास्त्राच्या वरिष्ठ प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना अटक केली. त्यांची दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात कसून चौकशी करण्यात आली असून, या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या तपासानुसार, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी असून त्याची साथीदार मनीषा वाघमारे हिच्या मदतीने महाराष्ट्रात मोठे नेटवर्क उभे करण्यात आले होते. २०२६ च्या नीट पेपरफुटीत महाराष्ट्र मॉड्यूलची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेल्या मनीषा मांढरे या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) तज्ज्ञ पॅनेलवर कार्यरत होत्या. तर पी. व्ही. कुलकर्णी हा अनेक वर्षांपासून नीटसाठी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या राष्ट्रीय पॅनेलचा सदस्य होता. त्यामुळे त्याला वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट प्रवेश होता. कोडवर्डचा वापर अन्.. कुलकर्णी पुण्यात घरगुती शिकवणी वर्ग चालवत होता. या वर्गांमध्ये तो विद्यार्थ्यांना “Guess Paper”च्या नावाखाली प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न वहीत लिहून घ्यायला सांगत असे. काही प्रश्न पाठ्यपुस्तकांमध्ये खास खुणा करून शिकवले जात होते. या व्यवहारासाठी सांकेतिक भाषेचा (कोडवर्ड) वापर केला जात होता, असे तपासात समोर आले आहे. ब्युटी पार्लरच्या आडून मोठे नेटवर्क या रॅकेटमध्ये मनीषा वाघमारे हिने पुण्यातील तिच्या ब्युटी पार्लरच्या आडून मोठे नेटवर्क उभे केले होते. तिने कोचिंग क्लासेस, समन्वयक आणि मेडिकल कन्सल्टन्सीशी संबंधित लोकांना जोडून पेपरफुटीचे जाळे तयार केले होते. या नेटवर्कमध्ये धनंजय लोखंडे, शेषराव आंबे, मोहक पराडकर आणि नमन नावाच्या तरुणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. NEET Paper Leak १० दिवसांची कोठडी दरम्यान, सीबीआयने छापेमारीत अनेक लॅपटॉप, मोबाईल फोन, बँक स्टेटमेंट्स आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांना दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात जयपूरमधून अटक करण्यात आलेल्या आरोपी दिनेश बिवल याची भाची, जी एसएमएस मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे, ती गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून, आगामी काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनीषा मांढरेंचा पाय खोलात NEET पेपरफुटी प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. या प्रकरणानंतर कॉलेज प्रशासनाने त्यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्यानंतर आता महाविद्यालयाकडूनही त्यांच्या भूमिकेची अंतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनीषा मांढरे या गेल्या २४ वर्षांपासून मॉडर्न कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे सीबीआयच्या तपासासोबतच आता महाविद्यालयीन कारवाईचाही फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. हेही वाचा : Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी