खटाव, (प्रतिनिधी) – कर्ती लोकसंख्या भारताला विकसित करू शकते. कर्त्या लोकसंखेच्या साह्याने शेती आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास करून विकसित भारताचे स्वप्न आपण साध्य करू शकतो. ए.पी. जे अब्दुल कलाम च्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्री व मानवी भांडवलाचा योग्य वापर करून २०४७ पर्यत विकसनशील ते विकसित भारत हे स्वप्न आपण साकार करू शकतो त्यासाठी तरुणांच्या योगदानाची फार मोठी गरज आहे, असे प्रतिपादन छ.शिवाजी कॉलेजचे प्रा. किशोर सुतार यांनी केले . सातारा येथील लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, अर्थशास्त्र विभागामार्फत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त “लोकसंख्या आणि विकसित भारत @ २०४७” या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आला. सदर कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ,महाविद्यालायचे कला व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. सुतार यांनी विविध देशांच्या लोकसंख्या व आर्थिक प्रगती याविषयीची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना लोकसंख्येविषयी जागृत केले. सध्याची भारताची लोकसंख्या पाहता आजच्या तरुण पिढीने लोकसंख्या नियंत्रित करणे हि काळाची गरज आहे असे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचा दर अधिक वेगाने वाढला तर विकसित भारत हे उद्दिष्ट २०४७ पर्यत नक्की साध्य होईल यात शंका नाही असेही ते म्हणाले. कला व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर यांनी अध्यक्षीय मनोगतातून उपस्थित विद्यार्थ्यांना लोकसंख्या आणि तरुणांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. तरुणाईने आपल्या कौशल्याच्या सहाय्यने आपला व देशाचा विकास करण्याचे आव्हान त्यांनी केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.एफ.मुजावर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रियांका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अर्थशास्त्र विभागातील प्रा. अशोक कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.