मृत्यूदर कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजनाची गरज

अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
पुणे – महापालिका व जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करून मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. करोनाला नियंत्रित करण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजनाबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झाली, त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, आ. अशोक पवार, आ. संजय जगताप, आ. अतुल बेनके, आ. राहुल कुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदी उपस्थित होते.
करोनामुळे नागरिकांच्या मनात भीती असल्यामुळे जनजागृतीच्या माध्यमातून त्यांचा विश्वास निर्माण करा. तसेच, ग्रामीण भागातील लोकांमध्ये गैरसमज निर्माण होवू नये, यासाठी करोनाबरोबर जगताना नागरिकांनी कशी काळजी घ्यावी असे समजावून सांगणे आवश्यक आहे, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिकेने बालेवाडीत बेडची व्यवस्था केली आहे. पण ग्रामीण भागातही तशी व्यवस्था उभी करावी लागेल, अशाही सूचना त्यांनी केल्या.
त्या-त्या भागातील भौगोलिक परिस्थिती बघून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. दरम्यान, खासगी दवाखान्यांचे 80 टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचे सर्व मजले उपयोगात आणले पाहिजे. निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही. मागणी केल्यास निधी उपलब्ध करून देऊ.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री





