“नकोशी’विरोधात व्यापक प्रबोधनाची गरज

– मुकुंद ढोबळे
शिरूर तालुक्यातील निमोणे, काठापूर, थेऊर (हवेली) जवळील कोलवडी येथे काही दिवसांच्या अंतरावर आई- वडिलांना नकोशी असणाऱ्या तीन नकोशी माता- पित्यांनी रस्त्यावर फेकून दिल्या होत्या. परंतु “देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे तिन्ही नकोशा सुखरूप आहेत. केवळ समाजाचे भान असलेल्या लोकांमुळेच त्या सुखरूप आहेत. परंतु नकोशीविरोधात व्यापक प्रबोधनाची गरज असल्याचे अधोरेखित होत आहे.
एकीकडे जगभरात कन्या दिन साजरा करत असताना शिरूर तालुक्यात मात्र, नकोशा माता- पित्यांना डोईजड होत आहेत. माता- पित्यांची मानसिकता, सोनोग्राफी करणारी सेंटर्स, बाळंतपण करणारे मोठे हॉस्पिटल्सची यात भर पडत आहे. जुलै महिन्यामध्ये काठापूर येथे नकोशी सापडली. त्यानंतर निमोणे या सधन गावात कन्यादिनाच्या पूर्वसंध्येला आणखी एक नकोशी सापडली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी हवेली तालुक्यातील कोलवडीमध्ये नकोशी सापडली. तीन्ही नकोशी रस्त्याच्या कडेला सोडून दिले आहे. या घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. एकीकडे “बेटी बचाव आणि बेटी पढाव अभियान सुरू आहे. यासाठी जनजागृती सुरू आहे. समाज आणि समाजाची मानसिकता अद्याप बदलली नाही, हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.





