Koynanagar: कोयना धरणाच्या डावा पायथा वीजगृहाची गरज स्पष्ट
Koynanagar कोयना धरण यंदा पुन्हा एकदा जलव्यवस्थापनाच्या प्रश्नामुळे चर्चेत आले आहे. दि. ३१ जुलै ते ९ ऑगस्ट या सलग दहा दिवसांत धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडे ठेवण्यात आले. या कालावधीत सुमारे १९ टीएमसी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग झाला.

Koynanagar: अधिक पाऊस पडून कोयना धरणात अतिरिक्त पाण्याची आवक झाल्यास पाऊसमान लक्षात घेऊन नदीपात्रात पाणी सोडावे लागते. मात्र, या पाण्याचा वापर होतनाही हे लक्षात घेऊन असेअतिरिक्तपाणी सोडताना ऊर्जा निर्मिती करण्यासाठी धरणाच्या डावा पायथा वीजगृह उभारण्याची गरज स्पष्ट झाली आहे.
कोयना धरण यंदा पुन्हा एकदा जलव्यवस्थापनाच्या प्रश्नामुळे चर्चेत आले आहे. दि. ३१ जुलै ते ९ ऑगस्ट या सलग दहा दिवसांत धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडे ठेवण्यात आले. या कालावधीत सुमारे १९ टीएमसी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग झाला. त्यातील तब्बल १७.९६ टीएमसी पाणी विनावापर सोडण्यात आल्याने उपलब्ध जलसंपत्तीच्या कार्यक्षम वापराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अतिरिक्त पाणी सोडणे धरणाच्या सुरक्षिततेसाठी अपरिहार्य असले, तरी त्याच पाण्याचा ऊर्जानिर्मितीसाठी अधिकाधिक उपयोग करता आला असता का, हा महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
धरण बांधताना त्याची क्षमता ठरविताना ७५ टक्के विश्वासार्हतेच्या पाण्याचा विचार केला जातो. त्यापेक्षा अधिक पाऊस पडून अतिरिक्त पाण्याची आवक झाल्यास धरणाची सुरक्षितता राखण्यासाठी वक्रद्वारातून पाणी सोडावेच लागते. त्यामुळे अतिरिक्त पाणी सोडले गेले म्हणजे ते संपूर्णपणे वाया गेले, असे म्हणता येणार नाही, अशी भूमिका कोयना प्रकल्पाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी मांडली. कृष्णा पाणी तंटा लवादाच्या निर्देशानुसार महाराष्ट्राने किती पाणी अडवायचे आणि किती सोडायचे, याचे नियोजन केले आहे. यंदा दुष्काळाचे भाकित खोटे ठरून प्रत्यक्षात जलमय वर्ष अनुभवायला मिळत असल्याचेही मोडक यांनी स्पष्ट केले. मात्र, धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याची वेळ येत असताना त्या पाण्याचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठी डावा पायथा वीजगृह उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य अभियंता असताना उदंचनासह चार प्रकल्प उभारण्याचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यातील अनेक प्रकल्प खासगी सहभागातून ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर उभारले जात आहेत. कोयना प्रकल्पाच्या डाव्या तीरावर सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेला डावा पायथा वीजगृह प्रकल्पही खासगीकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात समाविष्ट असल्याचे मोडक यांनी स्पष्ट केले. यावर्षी झालेल्या विसर्गाच्या आकडेवारीमुळे या प्रकल्पाची गरज अधिक प्रकर्षाने समोर आली आहे. दहा दिवसांत १९ टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यातील १७.९६ टीएमसी पाणी विनावापर गेल्याचे सांगितले जाते. म्हणजेच उपलब्ध पाण्यापैकी मोठा हिस्सा ऊर्जानिर्मितीसाठी वापरता आला नाही. यामुळे शासनाच्या जलव्यवस्थापन नियोजनाबरोबरच उपलब्ध पाण्यापासून आर्थिक मूल्य निर्माण करण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
डावा पायथा वीजगृहाचा पर्याय महत्त्वाचा
पाणलोट क्षेत्रात सध्या कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. सध्या धरणाची जलपातळी नियंत्रणात असली, तरी आवक पुन्हा वाढू शकते. अशा परिस्थितीत धरणाचे दरवाजे पुन्हा उघडावे लागू शकतात. त्यामुळे यापूर्वी विनावापर गेलेल्या १७.९६ टीएमसी पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी पावसाळ्यात अतिरिक्त आवक झाल्यानंतर पाण्याचा उपयोग वीजनिर्मितीसाठी करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकाच पाण्यापासून अतिरिक्त ऊर्जा निर्माण झाल्यास जलसंपत्तीचा आर्थिक उपयोगही वाढू शकतो. त्यामुळे डावा पायथा वीजगृह हा केवळ वीजनिर्मितीचा प्रकल्प न राहता कोयना धरणातील अतिरिक्त पाण्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.





