हरिनामाने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली !

‘माऊली माऊली’च्या जयघोषात भक्तीचा महापूर चंद्रभागेत विलीन
पंढरपूर – वारकरी संप्रदायात आषाढ महापर्वाला विशेष महत्त्व आहे. याच पर्वानिमित्ताने राज्यभरातून, देशभरातून लाखो भाविक टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘हरी विठ्ठल’ चा जयघोष करत संतांच्या पालख्या घेऊन पंढरपूरकडे चालत निघाले. शुक्रवारपासून वाखरीत विसावलेली ही मांदियाळी आज (शनिवारी) एकामागून एक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि भक्तिरसात न्हालेल्या या पंढरी नगरीत भक्तांचा महापूर उसळला.
सर्व पालखी सोहळे पंढरपूरला पोहोचले असून शहरात सुमारे १५ लाख विठ्ठल भक्तांचा जनसागर उसळला आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी भाविक, मंदिर परिसर भक्तगर्जना, चंद्रभागेच्या तीरावर हरिनामाचा अखंड गजर – अशा वातावरणात पंढरपूर नगरी अक्षरशः न्हालेली आहे.
शनिवारी सकाळी इसबावी पादुका मंदिराजवळ संत नामदेव महाराज स्वतः दुपारी १२ वाजता दाखल झाले. त्यांनी उपस्थित सर्व मानाच्या पालख्यांना ‘चला, पंढरीकडे!’ अशी दवंडी दिली. दुपारी १ वाजता संतांची पालखी यात्रा औपचारिकपणे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. नामदेव महाराजांचा पालखी सोहळा अग्रेसर होता. ‘नामदेव माऊली की जय’ चा घोष करत हा सोहळा भक्तिभावाने मार्गक्रमण करीत होता.मुक्ताईनगरहून आलेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यात सुमारे ५० हजार वारकरी सहभागी झाले होते.
प्रमुख म्हणून ॲड. रवींद्रभैय्या पाटील व ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे सहभागी होते. महिलांची सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. सकाळी इसबावी येथे दाखल झालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यात दुपारच्या भोजनानंतर सुमारे १ लाख वारकरी सहभागी झाले. प्रमुख म्हणून ॲड. सोमनाथ घोटेकर, श्रीपाद कुलकर्णी, जयंत गोसावी आणि गोकुळ गांगुर्डे यांचे नेतृत्व होते. सकाळी इसबावी येथे पोहोचलेला हा सोहळा दुपारी सव्वालाख भाविकांसह पंढरपूरकडे निघाला. यामध्ये रघुनाथ महाराज गोसावी आणि योगेश महाराज गोसावी प्रमुख उपस्थित होते. दुपारी १२ वाजता वाखरीतून सुमारे १.५ ते २ लाख भाविकांसह पंढरपूरकडे निघालेला सोहळा इसबावीच्या उभ्या रिंगण सोहळ्यानंतर भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करीत होता.
अश्वांची नेत्रदीपक दौड
सुमारे ३ ते ३.५ लाख वारकरींसह निघालेल्या या सोहळ्यात सायंकाळी इसबावी येथे उभ्या रिंगणात अश्वांची नेत्रदीपक दौड झाली. सोहळा प्रमुख गणेश मोरे, वैभव मोरे, दिलीप मोरे यांच्यासह अध्यक्ष जालिंदर मोरे सहभागी होते. रिंगणानंतर हा सोहळा थेट श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाला.
माऊलींचा पालखी सोहळा सर्वाधिक भव्य
दुपारी २.३० वाजता वाखरीहून निघालेला हा सोहळा सुमारे ५ लाख वैष्णव वारकऱ्यांसह निघाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांनी माऊलींच्या पालखीला वाखरीत खांदा दिला. सायंकाळी सव्वा सहा वाजता इसबावी येथे शेवटचे उभे रिंगण पार पडले. अश्व सोडण्यात आले, रथ ओढण्यात आला, आणि लाखो भक्तांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दर्शन घेतले. पादुका आरतीनंतर नवीन वस्त्रात गुंडाळून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात अर्पण करण्यात आल्या. त्यांच्यासोबत आरफळकर व वासकर होते. ही पादुका इसबावी ते पंढरपूर असा प्रवास करून रात्रौ ज्ञानेश्वर मंदिरात पोहोचल्या.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी महापूजा
रविवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी महापूजेची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.





