प्रभात वृत्तसेवा पिंपळे गुरव – रामनगर, पिंपळे गुरव येथील श्री स्वामी समर्थ दत्त दिगंबर सेवा ट्रस्टच्या वतीने श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच कीर्तन, प्रवचनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी आणि शुक्रवारी विविध विषयांवर प्रवचने झाली. शनिवारी (दि. २९)सायंकाळी अॅड. रोहन जमादार (माळवदकर) यांचे’ गुरु भक्ती हीच खरी शक्ती’ या विषयावर व्याख्यान होईल. मंगळवार (दि.२ डिसेंबर) सायंकाळी राजेंद्र पाटील (गुरुसेवा) व परमपूज्य गुरुवर्य मनोज वेदपाठक यांचे ‘नामस्मरणाचे महत्व’ या विषयावर प्रवचन होईल.बुधवारी (३ डिसेंबर) सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत ह भ प रघुनाथ महाराज गवांदे यांचे ‘गुरु ज्ञान’ या विषयावर प्रवचन होईल. गुरुवारी (दि. ४ डिसेंबर) श्रीदत्त जयंती दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ ते ९ अभिषेक आणि आरती, सकाळी १० ते १२ या वेळेत कीर्ती वेदपाठक आणि मंजिरी जोशी यांची संगीत सेवा, सकाळ १२ ते १ या वेळेत रिद्धी सिद्धी भजन सेवा होईल. सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत भव्य स्वरूपात बालदत्त पालखी सोहळा आणि पाळणा हा कार्यक्रम होईल. त्यानंतर ७ वाजता महाआरती झाल्यानंतर ७ ते ११ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे संचालक गुरुवर्य मनोज वेदपाठक यांनी दिली.