श्रीरामपूर – बायको नांदायला येत नाही म्हणून माहेरी जावून मेहुण्याच्या मुलाला पळवून नेण्यात आले होते. मात्र, त्या मुलाची दुसऱ्याच दिवशी हत्या केल्याचे आरोपीने तपासात सांगितले होते. त्यानंतर लहान मुलाचा मृतदेह शिवूर बंगला (ता.वैजापूर) येथे शुक्रवारी (ता.१३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मिळून आला. आरोपी व मुलाचा मृतदेह शिवूर बंगला पोलिसांनी श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी सुश्मिता त्रिभुवन हिने श्रीरामपूर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरन राहुल बोधक याच्याविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिजीत राजू त्रिभुवन (रा. नायगाव, ता.श्रीरामपूर) हे आपल्या कुटुंबासह शेतमजुरी करतात. त्यांची बहिण व तिचा पती राहुल पोपट बोधक (रा. चांदगाव, ता.वैजापूर) यांच्यात घरगुती वाद झाले होते. त्यामुळे बहिण व तिचा मुलगा हे नायगावला राहण्यास आले. शुक्रवारी (दि.६) राहुल बोधक हा नायगावला येऊन आपल्या पत्नीला बरोबर येण्यासाठी आग्रह करत होता. परंतु, तिने विरोध केल्यामुळे किरकोळ वाद झाले. यावेळी माझ्यासह पत्नी व आईवडिल आम्ही शेतात कांदे लावण्यासाठी गेलेलो होतो. त्यादरम्यान बोधक हा निघून गेला. मात्र, दुपारी साडेतीन वाजता माझी बहिण व आई हे नायगाव येथे गेलेले असताना मेहुणा बोधक हा पुन्हा आला. त्याने मुलाला दुकानात घेऊन जातो असे म्हणत त्याला बाहेर नेले. तेव्हा अभिजीत याची पत्नी सुश्मिता हिने विरोध केला. मात्र, तो त्याला बाहेर घेऊन गेला. त्याचा आजूबाजूला शोध घेतला मात्र तो सापडला नाही. तपासादरम्यान, शिवूर बंगला पोलिसांना त्याला शनिवारी (ता.७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने स्नेहदिप अभिजीत त्रिभुवन (वय अडीच वर्षे) याचे अपहरण करून खून केल्याचे सांगितले. त्याचा मृतदेह शिवूर बंगला परिसरात टाकल्याचे सांगितले. मात्र, नेमके ठिकाण आठवत नसल्याचे सांगितले. यानंतर श्रीरामपूर, शिवूर बंगाल व वीरगाव पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र, मृतदेह सापडत नव्हता. सोशल माध्यमातून लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्यास कळविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता.१३) सकाळी शिवूर बंगाल परिसरात मृतदेह असल्याची माहिती मिळाली. हत्येस सहा दिवस उलटल्याने व जंगला प्राण्यांनी मृतदेह कुरतडल्याने तो छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. त्यामुळे पोलिसांनी जागेवरच त्याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. तसेच आरोपीला श्रीरामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.