पुणे | खड्ड्यांच्या प्रश्नांवरून पालिकेचे हात वर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पावसाळ्यापूर्वी कोट्यवधींची कामे करत पुणेकरांना खड्डेमुक्त रस्ते देण्याचा दावा करणाऱ्या मनपा पथ विभागाने आता खड्डयांचे खापर पीएमआरडीए मेट्रो, महापालिका समान पाणीपुरवठा योजना आणि महावितरणकडून केल्या जाणाऱ्या खोदाईवर फोडले आहे. या विभागांना तत्काळ रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.
सध्या अनेक ठिकाणी जिथे कोणत्याही यंत्रणेचे काम नाही, तेथे पथ विभागाने नव्याने केलेले रस्तेही उखडले आहेत. याबाबत प्रशासनाने तोंडावर बोट ठेवले आहे. यातून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना मात्र अभय देण्यात आले आहे. पावसामुळे रस्ते दुरुस्त करणे शक्य नसल्याची कबुली देत पाऊस थांबताच दिवसा आणि रात्री खड्डे तातडीने बुजविण्यात येणार असल्याचा खुलासा पथ विभागाने प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केला आहे.
शहरात महापालिकेकडून १ मेपासून सर्व प्रकारच्या खोदाईस मनाई आहे. तसेच महावितरणला तातडीची बाब असल्यास खोदाईस परवानगी दिलेली आहे. समान पाणी योजनेचे काम मागे पडल्याने पावसाळ्यातही त्यांना टप्प्याटप्प्याने खोदाईस परवानगी दिली आहे.
त्यामुळे एखाद्या भागात ज्या यंत्रणेचे काम आहे, तेथेच खड्डे पडल्याचा दावा पथ विभागाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात मध्यवर्ती पेठा, तसेच अनेक प्रमुख रस्त्यांवर कोणतेही काम सुरू नाही अथवा नवीन रस्ते आहेत, पावसाळ्यापूर्वी पॅचवर्क करून खड्डे दुरूस्त केले होते, ते खड्डेदेखील उखडले आहेत. त्यासाठी पथ विभाग कोणाला जबाबदार धरणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. ते बुजविण्यात सततच्या पावसाने अडचणी येत आहेत. मात्र, शक्य त्या प्रकारे तत्काळ खड्डे दुरूस्तीचे आदेश दिले आहेत. तसेच पाऊस थांबताच लगेच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले जाईल. – डाॅ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त



