पालिका वैद्यकीय महाविद्यालयाचा निधीही पळवला साडेपाच कोटी रुपयांचा निधी प्रभागांमध्ये वळवला पुणे – महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा निधीही अखेर स्थायी समितीने वळवला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत या महाविद्यालयासाठीच्या 10 कोटींच्या तरतुदीमधील साडेपाच कोटी रुपये वेगवेगळ्या प्रभागांतील नगरसेवकांच्या विकासकामांसाठी देण्यात आला आहे. भाजपने 2019-20 च्या अंदाजपत्रकात शिवसृष्टी, शहर सायकल योजना, बालगंधर्व रंगमंदिर, नदी सुधार योजनांचा गवगवा करत अंदाजपत्रकात त्यासाठी कोट्यवधी रुपये ठेवले होते. या सर्व योजनांचा निधी वळवल्यानंतर आता वैद्यकीय महाविद्यालयाचा निधीही सर्व पक्षीयांना वाटून देण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून या वैद्यकीय महाविद्यालयाची केवळ चर्चाच होती. त्यानंतर भाजपचे पहिले स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी 2017-18 आणि 18-19 च्या अंदाजपत्रकात हे वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित केले. त्यानंतर काहीच हालचाल न झाल्याने सहा महिन्यांपूर्वी मुख्यसभेतच मोहोळ यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यानंतर या महाविद्यालयाचे काम वेगाने सुरू झाले. सल्लगार नेमून त्याचा अहवालही आला. त्यानंतर ट्रस्ट स्थापन करून हे महाविद्यालय उभारण्याच्या निर्णयास मान्यता देत हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अहमदाबाद पालिकेच्या मेडिकल कॉलेजलाही भेट दिली. त्यानंतर आता हे महाविद्यालय मान्यतेच्या प्रतीक्षेत असतानाच, त्यासाठीचा निधी स्थायी समितीने वळविला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत एका वर्गीकरणाच्या ठरावात 4 कोटी, तर दुसऱ्या ठरावात दीड कोटींचा निधी प्रभागांमधील रस्ते, चेंबर दुरुस्ती, ड्रेनेज अशा कामांसाठी वळवण्यात आला आहे. नगरसेवकांचा निधी कुठे गेला? महापालिकेत सत्ता येताच भाजपने अंदाजपत्रकात मोठे बदल केले आहेत. त्यात प्रामुख्याने 10 लाखांच्या आतील कामे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर, तर 25 लाखांच्या आतील कामे परिमंडळ आणि अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेसाठी येतात. त्याला स्थायी समितीची मान्यता घ्यावी लागत नाही. त्यामुळे मागील तीनही अंदाजपत्रकात स्थायी समिती आणि मुख्यसभेच्या मान्यतांचा फेरा चुकवण्यासाठी जवळपास 600 ते 700 कोटींची कामे नगरसेवकांचा वॉर्डस्तरिय निधी तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडे प्रस्तावित केली आहेत. अद्याप हा निधी खर्ची पडलेला नसतानाच. गेल्या चार महिन्यांत महापालिकेच्या मोठ्या योजनांचा निधी पळवण्याचा सपाटा सुरू आहे. त्यात शिवसृष्टी, स्वच्छ भारत अभियान, बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास, 11 गावे, नदी सुधार, सायकल, एचसीएमटीआर रस्ता, नदी सुधार अशा अनेक योजनांचा निधी नगरसेवकांचे मन राखण्यासाठी प्रभागात वळवण्यात येत आहे.