पुण्यातील पाषाण तलाव परिसरात लावलेला “तो’ बोर्ड महापालिकेने काढला

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 – महानगरपालिकेने “अविवाहित जोडप्यांना पाषाण तलाव’ परिसरात येण्यास बंदी घालणारा आदेश काढून ‘कपल नॉट अलाउड’ असा बोर्ड लावला होता. या निर्णयाला “राइट टू लव्ह’ संघटनेने विरोध केला होता. पालिकेने घेतलेला हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पालिका आयुक्तांना आणि उद्यान विभाग अधीक्षक अशोक घोरपडे
यांना दिले होते. यावर अखेर तो बोर्ड महापालिकेने काढला आहे.
अविवाहित जोडप्यांमुळे पक्षीनिरीक्षणात अडथळा येत असल्याचे कारण देत पुणे महानगरपालिकेने हा आदेश काढला होता. हा आदेश पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, त्यामुळे तत्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी संघटनेने केली होती.
असे वाद पुन्हा होऊ नयेत व प्रेम करणाऱ्या व्यक्तींवर अन्याय न होता त्यांचा सन्मान व्हावा, यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरातील किमान 10 गार्डन्स “कपल गार्डन्स’ म्हणून घोषित करावीत, यासाठी आम्ही येणाऱ्या काळात पाठपुरावा करणार असल्याचे संघटेनकडून सांगण्यात आले.





