नाशिक : नाशिकमधील कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंतांची निवास व्यवस्था तपोवनात केली जाते. म्हणूनच हा परिसर कुंभमेळा कालावधीत साधुग्राम म्हणून ओळखला जातो. कुंभमेळ्यातील अमृत पर्वात स्नानासाठी साधू, महंत रामकुंडाकडे वळतात. रामकुंडापर्यंत त्यांना तपोवनातून येणेच सोयिस्कर ठरते. तपोवनापासून रामकुंडापर्यंतचे अंतरही तसे फारसे नाही. तसेच पौराणिक काळी साधू, महंतांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती. त्यामुळेच तपोवनाची ओळख असल्याने आधुनिक काळातही साधू, महंतांची कुंभमेळ्यात वास्तव्यासाठी तपोवनालाच पसंती दिली आहे. परंतु आता येणाऱ्या कुंभमेळ्यात सुमारे चार लाखांहून अधिक साधू-महंंत साधुग्राममध्ये वास्तव्यास येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे साधुग्रामचा विस्तार करावा लागणार आहे. साधुग्रामसाठी १२०० एकर जागा प्रस्तावित असून महापालिकेत्या ताब्यात असलेल्या ५४ एकर जागेवर साधुग्राम उभारण्यासाठी १८२५ वृक्ष चिन्हांकित करण्यात आली अशी माहिती समोर आली आहे. महापालिकेने स्वत:ची ५४ एकर जागा साधुग्रामसाठी मोकळी करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. या आधी पवित्र अशा कुंभमेळ्यात कधीही वृक्षतोड झालेली नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याच्या शक्यतेने पर्यावरणप्रेमी मात्र आक्रमक झालेले दिसत आहेत. अर्थात, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या टोकाच्या विरोधाला आणि संतापाला अनेक करणे आहेत. तीन वर्षापासून महापालिकेता प्रशासकीय राजवट सुरु आहे. त्यामुळे नागरी समस्या सोडवण्याला सध्या कोणीच नाही, अशी भावना आहे. व्यक्तिगत जागेतील अत्यंत अडचण म्हणून झाड तोडणे कठीण असते कारण महापालिकेचे प्रशासन इतके जेरीस आणते की भविष्यात कोणीही भीतीने झाडे लावणार नाहीत. असे असताना स्वतः महापालिका १८०० झाडे तोडणार म्हटल्यावर समाजात संताप चांगलाच वाढला आहे. गरजेनुसार काही झाडे तोडावी लागणार आहेत. त्यासाठी महापालिकेने १,८३४ झाडांवर खुणा केल्या होत्या; परंतु या निर्णयाला पर्यावरण प्रेमींचा होणार विरोध बघून महापालिकेने यातील काही झाडे वाचवता येतील का? याची चाचपणी सुरू केली आहे. साधुग्रामसाठी झाडे तोडणे महत्वाचेच मात्र, त्यातील किती वाचवता येतील, याचा विचार आता केला जात आहे.